संसदेचे महत्वपूर्ण हिवाळी अधिवेशन आजपासून

संसदेचे हिवाळी अधिवेशन आज अर्थात सोमवारपासून सुरू होत आहे. त्यात प्रामुख्याने देशासमोरील आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील ‘नाकाबंदी’ तसेच, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्दय़ांवर विरोधक सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.
 
बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय ( हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) निर्वासितांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असून हिवाळी अधिवेशनातच ते संमत केले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्र सरकारने वटहुकूम काढलेला आहे. इलेक्टिक सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्यासंदर्भातही वटहुकूम काढलेला आहे. हे विधेयकही मंजूर करून घेण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे.
 
हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबपर्यंत चालणार असून त्यात २७ विधेयके मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांमध्ये मांडली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ विधेयके मंजूर करण्यात आली होती. त्यात जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक, अवैध कृत्य प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक मंजूर करून व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा हक्क तपास यंत्रणांना देण्यात आला होता.
 
मांडली जाणारी महत्त्वाची विधेयके : 
व्यक्तिगत माहिती संरक्षण, तृतीयपंथीयांचे हक्कव संरक्षण, इलेक्ट्रिक सिगरेट प्रतिबंध, औद्योगिक क्षेत्राशी निगडित संहिता, कर दुरुस्ती विधेयक, कंपनी दुरुस्ती विधेयक, चिट फंड दुरुस्ती विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, सरोगसी नियंत्रण विधेयक, जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक दुरुस्ती विधेयक.
 
२६ नोव्हेंबरला संयुक्त अधिवेशन : २६ नोव्हेंबर रोजी संसद संविधान दिवस साजरा करणार असून त्यानिमित्त एक दिवसाचे संयुक्त अधिवेशन घेतले जाईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे होतील.|

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती