CRPF शाळेजवळ मोठा स्फोट,NSG कमांडो घटनास्थळी

रविवार, 20 ऑक्टोबर 2024 (12:13 IST)
दिल्लीतील रोहिणीतील प्रशांत विहार परिसरात असलेल्या CRPF शाळेजवळ आज सकाळी मोठा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की शाळेची भिंत तुटली, जवळपासची दुकाने आणि एका कारचे नुकसान झाले. मात्र, यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिल्ली पोलीस या स्फोटाच्या तपासात व्यस्त आहेत. याशिवाय एनएसजी कमांडोही घटनास्थळी पोहोचले आहेत.

दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस) अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोहिणीच्या सेक्टर-14 मधील सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या, बॉम्ब निकामी पथक आणि पोलिस फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. DFS अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'आम्हाला सकाळी 7.50 वाजता CRPF शाळेच्या भिंतीजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवल्या. स्फोटामुळे आग लागली नाही किंवा कोणी जखमी झाले नाही,

गुन्हे शाखा आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आमची फॉरेन्सिक टीम आणि क्राईम युनिट घटनास्थळावरून नमुने गोळा करण्यासाठी घटनास्थळी हजर आहे. फटाक्यामुळे हा स्फोट झाला असावा, मात्र आम्ही या प्रकरणाची सर्व बाजू तपासत आहोत. घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सकाळी 7.47 वाजता मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितले की, 'स्फोटामुळे शाळेच्या भिंतीला तडे गेले असून दुर्गंधी येत होती. स्थानक प्रभारी/पीव्ही आणि इतर कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. शेजारील दुकानाच्या काचा व दुकानाजवळ उभ्या असलेल्या कारचे नुकसान झाले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पुढील तपास सुरु आहे.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती