भारतीय नौदलाने सोमालियाजवळ समुद्री चाच्यांना कसं पळवून लावलं?

शनिवार, 6 जानेवारी 2024 (11:32 IST)
शुक्रवारी संध्याकाळी (5 जानेवारी) भारतीय नौदलाच्या कमांडोंनी सोमालियाजवळ अडकलेल्या मालवाहू जहाजातून 15 भारतीयांसह 21 जणांची सुटका केली.
समुद्री चाचे या जहाजाच्या अपहरणाच्या तयारीत असल्याची माहिती नौदलला मिळाली होती.
 
त्यानंतर भारतीय नौदलाची युद्धनौका, विमान आणि ड्रोन यांच्या माध्यमातून जहाजाची सुटका करण्यात आली.
 
या दरम्यान या मालवाहू जहाजावर (MV लीला नॉरफोक) भारतीय नौदलाचे कमांडो पोहोचले तेव्हा मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत.
 
या संदर्भात नौदलाने तीन व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यात भारतीय कमांडो मालवाहू जहाजावर मदतकार्य करताना दिसत आहेत.
 
समुद्री चाचे येत असल्याचं कधी समजलं?
ब्राझीलहून बहरीनला जाणाऱ्या आणि लायबेरियन ध्वज असेलेलं मालवाहू जहाज MV लीला नॉरफोकच्या अपहरणाची बातमी गुरुवारी (4 जानेवारी) संध्याकाळी आली.
जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सने गुरुवारी (4 जानेवारी) यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सला संदेश पाठवण्यात आला.
 
यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स ही एक ब्रिटिश लष्करी संस्था आहे, जी मोक्याच्या सागरी मार्गांवरील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवते.
 
क्रूने पाठवलेल्या संदेशात पाच ते सहा बंदुकधारी जहाजावर चढल्याचे सांगण्यात आले.
 
यानंतर गुरुवारीच ही बातमी भारतीय नौदलाला देण्यात आली. त्यानंतर जहाज आणि त्यात अडकलेल्या क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.
 
भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच नौदलाने ताबडतोब तयारी सुरू केली.
 
यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत भारतीय नौदलाच्या कारवाईशी संबंधित बातम्या येऊ लागल्या.
 
संदेश मिळताच INS चेन्नई सोमालियाच्या दिशेने रवाना
सोमालियाजवळच्या अरबी समुद्रात अडकलेल्या या जहाजाकडे INS चेन्नई या युद्धनौकेला ताबडतोब पाठवणं, हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
 
समुद्रातील चाचेगिरी रोखण्यासाठी INS चेन्नईला तैनात केल्याचं भारतीय नौदलाने म्हटले आहे.
 
यासोबतच भारतीय नौदलाने गस्त घालण्यासाठी एक विमानही पाठवले त्याने त्या जहाजावरून उड्डाण केले.
 
या विमानाने मालवाहू जहाजाशी संवादही प्रस्थापित केला.
 
ड्रोनद्वारे सतत टेहळणी
INS चेन्नईने 5 जानेवारी रोजी दुपारी 3:15 वाजता MV लीला नॉरफोकला रोखल्याचं नौदलाने सांगितलं.
 
यानंतर, प्रीडेटर MQ9B ड्रोनच्या माध्यमातून जहाजावर सतत टेहळणी करण्यात आली.
 
यानंतर काही वेळातच INS चेन्नईवरील कमांडोंनी मालवाहू जहाजावर शोध मोहीम सुरू केली.
 
मालवाहू जहाज नॉरफोकची बचाव मोहीम ही भारतीय नौदलाच्या मुख्यालयातून थेट पाहिली जात होती.
 
नौदलाचे वरिष्ठ अधिकारी प्रीडेटर ड्रोनमधून येणाऱ्या फीडवर लक्ष ठेवून होते.
 
गुरुवारी संध्याकाळी अपहरणाची बातमी येताच नौदलाने आपले ड्रोन नॉर्फोकच्या निगराणीसाठी ठेवले होते, असंही सांगण्यात येत आहे.
 
नौदलाने जारी केलेल्या व्हिडिओंमध्ये कमांडो जहाजाच्या एकामागून एक भाग तपासताना दिसत आहेत.
 
या व्हिडिओंमध्ये कमांडो जहाजावर चढतानाही दिसत आहेत.
 
या दरम्यान नौदलाने संपूर्ण जहाजाचा शोध घेतला. पण त्यावर कोणतेही अपहरणकर्ते सापडले नाहीत. भारतीय नौदलाच्या इशाऱ्यानंतर समुद्री चाच्यांनी तिथून पळून गेले असावेत, असं भारतीय नौदलाच्या निवेदनात नमूद केलं आहे
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती