राहुल गांधींना हरवून 'जायंट किलर' ठरलेल्या स्मृती इराणींचाच अमेठीतून पराभव कसा झाला?

सोमवार, 10 जून 2024 (19:05 IST)
लोकसभा निवडणुकीचे सर्वाधिक आश्चर्यकारक निकाल उत्तर प्रदेशातून आले आहेत. सर्व अंदाज आणि एक्झिट पोल यांना चुकीचं ठरवत इंडिया आघाडीनं भाजपाच्या एकहाती बहुमत मिळवण्यापासून रोखलं आहे.तसं पाहता उत्तर प्रदेशात अनेक जागांवर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळाली.

मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक मतदारसंघ असा होता ज्याच्या निकालावर सर्वाचंच लक्ष लागलेलं होतं आणि तो मतदारसंघ म्हणजे अमेठी.अमेठीतून काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा 1 लाख 66 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.किशोरी लाल शर्मा यांना निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडीनं सर्व ताकद लावली होती.
 
प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेली मतदारसंघाबरोबर अमेठीत किशोरी लाल शर्मा यांच्यासाठी देखील तितकीच मेहनत घेतली.स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव केल्यानंतर राहुल गांधी यांचं अमेठीत येणं थांबलं होतं.अशा परिस्थितीत राजकीय विश्लेषकांमध्ये अशी देखील चर्चा होऊ लागली होती की गांधी कुटुंबानं ही जागा कायमची सोडून दिली आहे.
 
किशोरी लाल शर्मांबद्दल विश्वास
2024 च्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर अमेठीतून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, याबद्दलच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत सस्पेन्स राखल्यानंतर तीन मे च्या सकाळी इंडिया आघाडीनं अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांना काँग्रेसची उमेदवारी दिली.
 
किशोरी लाल शर्मा यांनी रायबरेलीत सोनिया गांधी आणि अमेठीतून राहुल गांधी यांच्या खासदार प्रतिनिधीच्या रूपानं काम केलेलं होतं. मात्र काँग्रेस पक्ष त्यांना अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल याचा अंदाज कोणालाही आला नव्हता.
 
अर्थात या निर्णयावर अनेक प्रकारचे प्रश्न उभे करण्यात आले की राहुल गांधी यांनी एकप्रकारे पळ काढला आहे. आधी असं मानलं जात होतं की राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवली तर मागील वेळचा पराभव लक्षात घेता सर्व दबाव त्यांच्यावर असेल आणि स्मृती इराणी यांच्यासाठी ही लढत सोपी होईल. मात्र असं झालं नाही.
 
किशोरी लाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर सर्व दबाव स्मृती इराणी यांच्यावर आला.
 
राजकीय विश्लेषकांना वाटतं की अमेठीच्या जनतेमध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्मृती इराणींबद्दल प्रचंड नाराजी होती.
 
अमेठीतील वरिष्ठ पत्रकार हम्माद सिद्दीकी सांगतात, "स्मृती इराणी यांच्या वर्तनाबद्दल लोकांमध्ये असंतोष होता. स्मृती इराणी केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या मात्र मागील पाच वर्षात त्यांनी ठोस स्वरुपाचं कोणतंही विकास काम केलं नाही. याचबरोबर महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्याबाबत जनता स्मृती इराणींवर नाराज होती."
 
अमेठीचे लोक काय म्हणाले
गौरीगंज भागातील रहिवासी असलेले कर्म प्रसाद द्विवेदी यांनी दावा केली की स्मृती इराणी यांनी कोणतंही काम केलं नाही.
 
त्यांनी सांगितलं की, "त्या मंत्री असल्यामुळे खूप काम होईल अशा जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र असं काहीही झालं नाही. स्मृती इराणी यांच्या पराभवाचं एक कारण हे देखील आहे की पंतप्रधानांनी ज्याप्रकारे मंगळसूत्र आणि म्हैस बद्दलची वक्तव्ये केली त्यामुळे जनता त्यांच्यावर नाराज झाली. मागील वेळेस राहुल गांधींचा पराभव झाला त्याबद्दल जनता स्वत: दु:खी झाली होती. किशोरी लाल शर्मा यांना या भागातील जनता चांगल्या पद्धतीनं ओळखते, त्यामुळे त्यांचा विजय झाला."

तर गंगा शंकर मिश्र म्हणाले, "काँग्रेसचा इथे विजय होणार आहे हा निकाल आधीपासूनच निश्चित होता. मागील वेळेस राहुल गांधी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळेस जनतेनं हे कर्ज फेडण्यासाठी किशोरी लाल शर्मा यांना निवडून दिलं. स्मृती इराणी आणि त्यांच्या स्थानिक प्रतिनिधींच्या कार्यशैलीमुळे इथले लोक नाराज होते. त्यामुळेदेखील त्यांचा पराभव झाला."
 
अमेठीतील एक तरुणानं सांगितलं की, "माझं नाव अमेठीयन आहे, कारण आम्ही अमेठीचे निवासी आहोत. हीच आमची ओळख आहे."
 
या तरुणानं सांगितलं की "अमेठीनं आपला सन्मान परत मिळवला आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांचा पराभव झाल्यापासून अमेठीची जनता दु:खी होती. लोकांना या गोष्टीची जाणीव होती की खोट्या प्रचाराला बळी पडून त्यांनी हिरा गमावून प्लास्टिकला जवळ केलं होतं."
 
अब्दुल मजीद या दुसऱ्या एका तरुणानं सांगितलं की "जायस गावात एक महिला हॉस्पिटल आहे. ते बंद पडलं आहे मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही. या भागातील महिलांच्या उपचारासंदर्भात मोठी समस्या आहे. मात्र स्मृती इराणी यांनी खासदार असताना यासंदर्भात काहीही काम केलं नाही."
 
महागाई आणि मोकाट जनावरं हा सुद्धा मुद्दा
स्मृती इराणी यांच्या पराभवाबद्दल बोलताना अमेठीतील महिला बिट्टन म्हणाल्या, महागाई आणि मोकाट जनावरं या प्रश्नांमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे लोकांनी भाजपाला मतं दिली नाहीत.
 
तर रीता म्हणाल्या, "मोकाट जनावरं, महागाई आणि बेरोजगारी या कारणांमुळे जनतेनं भाजपाला मतं दिली नाहीत. महागाई कमी झाली पाहिजे आणि लोकांना रोजगार मिळाला पाहिजे."
 
स्थानिक रहिवासी संजय कुमार शर्मा या परिसरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नाला अधोरेखित करत म्हणाले, "मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार पाच किलो रेशनचं धान्य देतं, मात्र पाच बीघे पीक जनावरंच खाऊन जातात. आधी ज्यांच्या शेतात पाच क्विंटल धान्य व्हायचं त्यांच्या शेतात आता एक क्विंटल देखील नसतं. जर शेतकरी रात्रभर शेताची राखण करेल तर तो दिवसा काम कसं करू शकेल. यामुळेच जनतेनं भाजपाला नाकारलं आहे."
 
तर खुशबू या महिलेनं सांगितलं की "राहुल गांधी यांच्या सरकारच्या काळात अमेठीत जास्त सुविधा मिळायच्या. म्हणूनच लोकांनी कॉंग्रेसला मतं दिली."
 
जनतेपासून दुरावलेल्या स्मृती इराणी
एमबीएचा विद्यार्थी असलेला सनत कुमार मिश्र स्मृती इराणी यांच्या पराभवामागच्या कारणांबद्दल सांगतो की, "त्या लोकांशी जोडलेल्या नव्हत्या. त्या जेव्हाही दौऱ्यावर यायच्या तेव्हा लोकांना भेटत नसत. काही मोजके लोकच त्यांच्याभोवती असत. मागील पाच वर्षात राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही काम केलं नाही."
 
"तुम्ही हेदेखील लक्षात घ्या की यंदाची निवडणूक जनतेनं लढवली. कारण इथं जे काही आहे ते कॉंग्रेसनं दिलेलं आहे. एचएल, बीएचएल, फूड पार्क आणि पेपर मिल हे सर्व काँग्रेसनं दिलेलं आहे. राहुल गांधी यांच्या पराभवानंतर असं वाटत होतं की अमेठी उद्धवस्त झालं आहे."
 
संजय बाबा हा आणखी एक रहिवासी म्हणाला, "जायस हून अमेठीला जाण्यासाठी आज सुद्धा बसची सुविधा नाही. आमच्या इथल्या आठ पॅसेंजर ट्रेन बंद आहेत. याबद्दल अनेकदा तक्रार केली, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही."
 
किशोरी लाल शर्मा यांना विजय मिळवून देण्यामध्ये समाजवादी पार्टीचं देखील योगदान आहे. किशोरी लाल शर्मा यांच्या बाजूनं वातावरण निर्माण करण्यासाठी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी अमेठी मध्ये संयुक्त प्रचारसभा घेतली होती.
 
अमेठीतील समाजवादी पार्टीचे खनिजदार जैनुल हसन म्हणाले, "स्मृती इराणींनी प्रत्यक्षात काहीही काम केलेलं नाही आणि मागील पाच वर्षांत फक्त अमेठीचीच नाही तर संपूर्ण राज्यातील जनता भारतीय जनता पार्टीला वैतागली होती. दिशाभूल होत लोकांनी 2019 मध्ये भाजपाला मतं दिली होती."
 
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि किशोरी लाल शर्मा यांचे इलेक्शन एजंट सुरेश प्रताप सिंह यांनी किशोरी लाल शर्मा यांच्या विजयाची अनेक कारणं सांगितली.
 
ते म्हणाले, "सर्वांत मोठं कारण म्हणजे या मतदारसंघातील प्रत्येक गावात काही लोकं अशी आहेत जी किशोरी लाल शर्मा यांच्याशी थेट जोडलेली आहेत. त्यांनी मागील 40 वर्षांत राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबरोबर काम केलं आहे. याशिवाय अमेठीच्या जनतेनं 2019 मध्ये झालेली चूक दुरुस्त करण्याचं काम केलं आहे."
 
स्मृती इराणींच्या काळात कोणती कामं झाली?
दुसऱ्या बाजूला स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर अमेठीतील भाजपा कार्यालयात शांतता पसरलेली आहे. कार्यालयात कोणताही पदाधिकारी हजर नव्हता.
 
अमेठी मतदारसंघातील भाजपाचे महामंत्री सुधांशू यांनी सांगितलं की "दीदीनं अमेठीमध्ये खूप विकास केला. इतकं काम तर 70 वर्षांत झालं नाही."
 
कामांबद्दल बोलताना ते सांगतात, "स्मृती इराणी यांनी अमेठी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी 4 किलोमीटर लांबीचा बायपास तयार केला. अमेठीच्या दक्षिण भागात रेल्वेचा ओव्हर ब्रिज बनवला. यामुळे या परिसरातील जवळपास 50 हजार लोकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. त्यांनी केंद्रीय विद्यालयाची इमारत बांधली, कृषी विज्ञान केंद्र बनवलं, मृदा परीक्षण केंद्र तयार केलं, अमेठी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्टेशनांचा विस्तार आणि सुशोभीकरण केलं."
 
"एफएम सेंटरची स्थापना झाली, सैनिक शाळा बनवली, 50 खाटाचं आयुष हॉस्पिटल बनवलं, तिलोई भागात 200 खाटांचं रेफरल हॉस्पिटल बनवलं. जगदीशपूरमध्ये ट्रॉमा सेंटर तयार केलं, गोमती नदीवर पाईपच्या अनेक पुलांचं बांधकाम केलं, खाऱ्या पाण्याची समस्या असलेल्या निगोहा भागात पाण्याची टाकी बांधली, मतदारसंघातील मंदिरांचं सुशोभीकरण केलं."

ते पुढे म्हणतात, "दीदी सतत लोकांमध्ये मिसळत होत्या आणि त्यांनी जनतेच्या समस्या दूर केल्या. देश स्वतंत्र झाल्यापासून जितकं काम झालं नव्हतं त्यापेक्षा अधिक काम मागील 10 वर्षात झालं. विशेषकरून 2019 ते 2024 दरम्यान खासदार असताना दीदीने खूप विकास केला आहे. आता पराभव का झाला आहे यावर चिंतन केलं जाईल आणि पराभवामागची कारणं शोधली जातील."
 
स्मृती इराणी यांनी एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं आहे की, "हे जीवन आहे. एक दशकभर मी एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत जात राहिले, लोकांच्या आयुष्यासाठी आणि अपेक्षा पूर्ततेसाठी काम करत राहिली. रस्ते, गटार, बायपास आणि मेडिकल कॉलेजसह इतर गोष्टी बांधल्या. माझ्या विजयात आणि पराभवात जे लोक माझ्यासोबत उभे आहेत, मी त्यांची नेहमीच आभारी राहीन."स्मृती इराणी असंदेखील म्हणाल्या की त्यांचा जोश अजूनही 'हाय' आहे

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती