एप्रिल ते जूनदरम्यान कडक उन्हाळा

सोमवार, 3 एप्रिल 2023 (07:39 IST)
पुणे:दक्षिण भारत वगळता मध्य, पूर्व, उत्तर भारतात एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, एप्रिलमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने शनिवारी वर्तविली. दरम्यान, सध्या एल निनोची स्थिती न्यूट्रल असली तरी जून ते सटेंबर या कालावधीत त्यांच्यात बदल होण्याचा अंदाज असून, याच्या मान्सूनवरील परिणामावर हवामान विभाग लवकरच भाष्य करेल, असेही हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजम मोहोपात्रा यांनी स्पष्ट केले.
 
हवामान विभागाने शनिवारी पत्रकार परिषद घेत देशातील एप्रिल ते जून या कालावधीतील उन्हाळय़ाचा अंदाज जाहीर केला. त्यावेळी डॉ. मोहोपात्रा बोलत होते. एप्रिलच्या पहिल्या तसेच दुसऱ्या आठवडयापर्यंत कमाल तापमानात फारसा फरक पडणार नाही. दुसऱ्या आठवडय़ानंतर मात्र कमाल तापमान देशभरात वाढणार आहे. दक्षिण भारत तसेच वायव्य भारतातील राजस्थान व गुजरातचा काही भाग वगळता देशभरात या तीन महिन्याच्या कालावधीत वायव्य, उत्तर पश्चिम भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. त्यातही ओरिसा व पश्चिम बंगालच्या तटवर्ती भागात उन्हाचा कडाका जास्त असेल. याबरोबरच वायव्य भारत, उत्तर भारत तसेच पूर्वेकडच्या भागात किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती