हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा, सहकारी मंत्र्याची माहिती

मंगळवार, 12 मार्च 2024 (13:28 IST)
मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती हरियाणाचे मंत्री कंवर पाल गुर्जर यांनी दिली आहे.खट्टर यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनीही त्यांच्या पदांचे राजीनामे राज्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

राजीनामा देण्यापूर्वी मनोहर लाल खट्टर भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी चंदिगढमधील हरियाणातील निवासस्थानी पोहोचले होते. याआधी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये खट्टर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. हरियाणात भाजप आणि जेजेपीची युती तुटू शकते अशीही चर्चा आहे.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने जेजेपीसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप नेते आणि हरियाणा सरकारचे मंत्री कंवर पाल गुर्जर यांनी राजीनाम्याची पुष्टी केली आहे.
 
ते म्हणाले, "माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे आणि त्यांच्यासह सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आहे." त्यांना पुढच्या मुख्यमंत्र्यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "सीएम एकदम ठीक आहेत. सीएम साहेबच पुढचे सीएम राहतील."
 
90 सदस्यांच्या हरियाणा विधानसभेत भाजपचे 41 आमदार असून त्यांना आमदार गोपाल कांडा यांच्यासह 5 अपक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजपसोबत युती असलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) 10 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 30 आमदार आहेत.
 
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती