हरविंदर सिंग रिंदा: कधीकाळी नांदेडमध्ये राहणारा पण आता पाकिस्तानात राहणारा दहशतवादी

सोमवार, 9 मे 2022 (21:05 IST)
मयांक भागवत
सध्या नांदेडमध्ये एका नावाचीच दहशत ऐकायला मिळत आहे. व्यावसायिक, रिअल इस्टेट व्यावसायिक, बिल्डर्स, क्लासचालक हे लोक नांदेडमधून पलायन करत आहेत असं म्हटलं जात आहे. याचं काय कारण आहे तर, 'रिंदा'ची धमकी.
 
काही दिवसांपूर्वीच नांदेडमधील बड्या बिल्डरची घरासमोरच हत्या झाली त्यानंतर नांदेडमधील अनेक व्यावसायिकांना शहरात राहण्याचा धसका घेतला. त्या व्यावसायिकालाही रिंदाने एक वर्षापूर्वी धमकी दिली होती. याच रिंदाचं नवीन प्रकरण समोर आलंय.
 
हरियाणा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कर्नालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक केलीये. या कथित दहशतवाद्यांकडून 3 बॅाम्ब (IED) जप्त करण्यात आलेत.
 
हे आरोपी ISI च्या संरक्षणात पाकिस्तानमध्ये लपलेला कथित खालिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाच्या संपर्कात होते.
 
ही स्फोटकं महाराष्ट्रात दहशतवादी कारवायांसाठी पाठवण्यात येणार होती, अशी माहिती हरियाणा पोलिसांनी दिलीये. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झालेत.
 
हरविंदर सिंग रिंदा मूळचा महाराष्ट्राचा आहे. कर्नालमध्ये सापडेली स्फोटकं आणि नांदेडच्या व्यावसायिकांना येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्नांची मालिका समोर आली आहे. रिंदाचा महाराष्ट्रात तर घातपात करण्याचा विचार नाही ना, खलिस्तानी दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई तर नाही ना, या रिंदाची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?
 
या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून केला आहे.
 
करनाल स्फोटकांचं महाराष्ट्र कनेक्शन काय?
हरियाणा पोलिसांनी करनाल जिल्ह्यात गुरूवारी (5 मे) चार आरोपींना अटक अटक केली.
 
हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "पंजाब पोलिसांसोबत एका संयुक्त कारवाईत मोठी संभाव्य दहशतवादी कारवाई थोपवण्यात आली," या प्रकरणी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीये.
 
आरोपींकडून 3 बॅाम्ब, 31 काडतूसं, एक पाकिस्तानी बनावटीचं पिस्तूल आणि 1 लाख 30 हजार रूपये रोकड जप्त केलीय.
 
हरियाणा पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी कथितरित्या पाकिस्तानमध्ये असलेल्या खालिस्तानी अतिरेकी हरविंदर सिंह रिंदाच्या गेल्या नऊ महिन्यांपासून संपर्कात होते.
 
हरियाणा पोलिसांच्या तपासात असंही समोर आलंय की, रिंदाच्या आदेशावरून या संशयित दहशतवाद्यांनी ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात महाराष्ट्रात स्फोटकं पोहोचवली होती.
 
महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केली चौकशी
हरविंदर सिंग रिंदा महाराष्ट्रातील नांदेडचा आहे. नांदेडमध्ये त्याची गॅंग सक्रिय आहे. त्यातच स्फोटकं नांदेडला पाठवण्यात येणार होती आणि याआधी स्फोटकं पाठवली अशी माहिती समोर आल्याने महाराष्ट्र पोलीस सतर्क झालेत.
 
महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, रिंदा सद्यस्थितीत पाकिस्तानात आहे. ISI च्या इशाऱ्यावर काम करतोय.
 
नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले, "नांदेड पोलिसांची टीम पंजाबला पाठवण्यात आलीये. आरोपींच्या चौकशीनंतर यापूर्वी स्फोटकं पाठवण्यात आली. कोणाला देण्यात आली," या सर्व मुद्दयांवर तपास केला जातोय.
 
नांदेड शहरात हरविंदर सिंग रिंदाची गॅंग खंडणी आणि धमकी देऊन पैसे उकळण्याचं काम करते, "रिंदाचे 50 साथीदार नांदेडमध्ये आढळून आलेत. पोलीस वेळोवेळी त्यांची झडती घेतात. तपास करतात आणि चौकशी करतात," पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे पुढे सांगतात.
 
रिंदाच्या गॅंगचे काही आरोपी जेलमध्ये तर काही जामीनावर बाहेर आहेत. काही आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
 
महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकानेही याबाबत चौकशी सुरू केलीये. नाव न घेण्याच्या अटीवर एटीएसचे अधिकारी सांगतात, "महाराष्ट्रात RDX आलं असेल असं वाटत नाही," आरडीएक्स राज्यात येणं इतकं सोपं नाही.
 
महाराष्ट्रात स्फोटकं आली आहेत का? याबाबत महाराष्ट्र एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनीत अग्रवाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "एटीएसची टीम हरियाणात आहे. आरोपींची चौकशीकरून अधिक माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय."
 
कोण आहे हरविंदर सिंग 'रिंदा'?
हरविंदर सिंग 'रिंदा'चं कुटुंब मूळचं पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यातील. पण त्याचा जन्म नांदेडमध्ये झाला. त्याचे वडील 1976 मध्ये नांदेडमध्ये रहाण्यास आले होते.
 
नांदेडच्या गुरूद्वाराजवळ ते भाड्याच्या घरात रहात होते. 35 वर्षांचा हरविंदर सिंग 'रिंदा' गेली कित्येक वर्ष नांदेडमध्ये रहात होता. नांदेडच्या युनिव्हर्सल इंग्लिश शाळेतून शिक्षण पूर्ण केलंय.
 
नांदेड पोलिसांकडून कारवाईच्या भीतीने रिंदा पुन्हा पंजाबमध्ये पळून गेला. पंजाब विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात 2016 मध्ये त्याने भाग घेतला होता. रिंदाने स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या नेत्यांवर गोळीबार केला होता.
 
हरविंदर सिंग 'रिंदा'ची गुन्हेगारी पार्श्वभूमी?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'रिंदा'ने प्रॅापर्टीच्या वादातून एका नातेवाईकाची हत्या केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. 2015 पर्यंत रिंदा आणि त्याचा चुलतभाऊ जेलमध्ये होते.
 
जेलमध्ये असताना रिंदाने जेलर आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 
नांदेडमध्ये हरविंदर सिंग रिंदावर 14 तर पंजाबमध्ये 23 गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्या, धमकी यांसारखे गुन्हे रिंदावर आहेत.
 
जेलमधून सुटून हरविंदर सिंग रिंदा 2016 मध्ये पुन्हा महाराष्ट्रात आला.
 
हरविंदर 'रिंदा'च्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत बोलताना नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे सांगतात, "2016 पासून 'रिंदा'वर नांदेड आणि पंजाबमध्ये गुन्हे दाखल आहेत," नांदेडमधील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी रिंदाच्या नावाने किंवा त्यांच्या आवाजातील धमकीचे मेसेज आले आहेत.
 
नांदेड शहरात'रिंदा'ची मोठी हदशत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पत्र पाठवून रिंडाने खंडणी मागितली होती.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतापराव चिखलीकर म्हणाले होते, "रिंदाने खंडणीसाठी मला सात महिन्यांपूर्वी पत्र पाठवलं होत. 10 कोटी रूपयांत खंडणी मागितली होती," माझ्यासारख्या खासदाराला धमकी मिळते, तर लोकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
 
काही महिन्यांपूर्वी नांदेडचे बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रिंदाने काही वर्षांपूर्वी संजय बियाणी यांना धमकी दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती. खंडणीच्या वादातून बियाणी यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
 
नाव न घेण्याच्या अटीवर एटीएसचे अधिकारी म्हणतात, "रिंदा फोन वापरत नाही. तो त्याच्या आवाजात व्हॅाइस मेसेज रिकॅार्ड करतो," आणि आपल्या साथीदारांमार्फत खंडणीसाठी लोकांना हे मेसेज पाठवतो.
 
पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला रिंदा
2016 पासून विविध प्रकरणात महाराष्ट्र आणि पंजाब पोलीस रिंदाला शोधत आहेत. त्याला पकडण्याची 2017 मध्ये पोलिसांना एक संधी मिळाली होती.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, हरविंदर सिंग 'रिंदा' आणि त्याची पत्नी हरप्रीत कौर बंगळुरूच्या एका हॅाटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
पोलिसांनी रेड केली पण, रिंदा खिडकीतून उडी टाकून फरार झाला. त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती