हमीद अन्सारीः पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्यानंतर माजी उपराष्ट्रपतींवर टीका का होतेय?

बुधवार, 13 जुलै 2022 (20:25 IST)
पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा आणि भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यात झालेल्या भेटींवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर निशाण साधत काही प्रश्न उपस्थित केलेत.
 
पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी दावा केलाय की, 2005 ते 2011 च्या कालावधीत हमीद अन्सारींनी त्यांना 5 वेळा दिल्लीत आमंत्रित केलं होतं. या कालावधीतली माहितीही त्यांनी शेअर केली होती.
 
त्यांच्या या दाव्यानंतर भाजपने हमीद अन्सारी आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधलाय.
 
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही प्रश्नही विचारले.
 
पत्रकार परिषदेत गौरव भाटिया म्हणाले की, "मिर्झा म्हणतात त्याप्रमाणे, त्यांच्या भारत दौऱ्यात त्यांनी अन्सारी यांची भेट घेतली. यावेळी अन्सारींनी त्यांना गोपनीय आणि संवेदनशील माहिती शेअर केली. उपराष्ट्रपती हे घटनात्मक पद आहे. आणि असे बरेचसे मुद्दे आहेत ज्याची माहिती शेअर करता येत नाही कारण ती राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत."
 
गौरव भाटिया पुढे म्हणाले, "देशातला दहशतवाद संपवण्यासाठी काँग्रेस सरकारने हे धोरण अवलंबलं होतं का? देशाच्या जनतेच्या मनात हे प्रश्न आहेत. काँग्रेसने आजवर आपल्या देशाच्या गोपनीय बाबी इतर देशांना शेअर केल्याचा परिणाम देशात दहशतवादी कारवाया झाल्या. त्यामुळे देशातील जनता आज नाराज आहे."
 
ते पुढे म्हणतात की, "पाकिस्तानी पत्रकार सांगते की अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय अशी माहिती केवळ एकदा नव्हे तर पाच वेळा शेअर करण्यात आली. आणि त्यांनी ही माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून घेतली. पुढे ही माहिती भारताविरोधात वापरली गेली."
 
यावर गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की, "भारत जगभरात दहशतवादाविरोधातील मोहिमेत मुख्य भूमिका बजावतोय. आणि दुसरीकडे काँग्रेस सरकार 2005 ते 2011 दरम्यान अशा व्यक्तीला भारतात येण्याचे निमंत्रण देते. देशाची गोपनीय माहिती शेअर केली जाते."
 
गौरव भाटिया यांनी हमीद अन्सारींना उद्देशून काही प्रश्न विचारलेत, "तुम्ही या व्यक्तीला आमंत्रित केलं होतं का? संवेदनशील आणि गोपनीय माहिती अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे शेअर केली होती का?"
 
अन्सारी यांनी जर हे केलं असेल तर त्यांनी त्याची माहिती आत्ताच्या सरकारला द्यावी. जेणेकरून ते देशाप्रती समर्पित असल्याचं दिसेल.
 
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत असलेल्या पत्रकाराला अन्सारी जर बोलवत असतील तर त्याबाबतीत आपल्या गुप्तचर यंत्रणांनी अन्सारी यांना सतर्क केलं होतं का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
यावेळी भाटियांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ही तोफ डागली. सोनिया आणि राहुल यांच्या सांगण्यावरून अन्सारी यांनी पाकिस्तानी पत्रकाराला निमंत्रण दिलं होतं का ? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
 
व्यक्तिगत पातळीवरचे खोटे आरोप-अन्सारी
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्यांवर आणि भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. हमीद अन्सारी यांनी आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं निवेदन प्रसिद्ध केलंय.
 
या निवेदनात हमीद अन्सारी म्हणतात की, "कालपासून माझ्याविरोधात व्यक्तीगत पातळीवर खोटे आरोप केले जात आहेत. यात मीडियाच्या एका ग्रुपने आणि नंतर भाजपच्या अधिकृत प्रवक्त्याने हे आरोप केलेत."
 
ते पुढे म्हणतात की, "मी भारताचा उपराष्ट्रपती असताना पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना निमंत्रित केलं होतं असं सांगण्यात येतंय. दिल्लीतील दहशतवादावरील परिषदेत मी त्यांची भेट घेतली आणि इराणमधील भारताचा राजदूत असताना मी राष्ट्रीय हितांशी गद्दारी केली, असं म्हटलं गेलं. या प्रकरणातील आरोप भारत सरकारच्या एजन्सीच्या एका माजी अधिकाऱ्याने केलेत."
 
"उपराष्ट्रपती हे सरकारच्या आणि सामान्यतः परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार परदेशी मान्यवरांना आमंत्रित करतात हे उघड सत्य आहे. मी 11 डिसेंबर 2010 रोजी दहशतवादावरील परिषदेचे उद्घाटन केले. मला या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं. आयोजकांनी ज्या लोकांची यादी तयार केली होती त्यांना मी आमंत्रित केलेलं नव्हतं किंबहुना मी त्यांना भेटलो ही नाही."
 
हमीद अन्सारी पुढे म्हणाले की, "इराणमधील भारताचा राजदूत म्हणून मी जे काही काम केलंय ते त्यावेळच्या सरकारला माहीत होतं. अशा प्रकरणांमध्ये मी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांना महत्व देऊन, त्यावर भाष्य करणे टाळतो. भारत सरकारजवळ याबाबतीत सर्व काही माहिती असून, हे सांगण्याचा अधिकार ही त्यांचाच आहे. तेहराननंतर, संयुक्त राष्ट्रात भारताचा स्थायी प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली होती. मी केलेल्या कामाचं देश आणि परदेशात कौतुक झालंय."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती