गुजरातमधील सुरत शहरातील एका अपार्टमेंटमध्ये 58 वर्षीय महिला, तिच्या दोन बहिणी आणि मेहुणे शनिवारी मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी ही माहिती दिली. गॅसवर चालणारे गिझर चालू ठेवल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता असल्याचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) आर.पी. बारोट यांनी सांगितले. मात्र, मृत्यूचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
ते म्हणाले की, सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना मृतदेह असल्याची माहिती मिळाली. फ्लॅट मालक जसुबेन बधेल, तिची बहीण शांताबेन बधेल (53), गौरीबेन मेवाड (55) आणि गौरीबेन यांचे पती हिराभाई (60) यांचे मृतदेह अपार्टमेंटमध्ये सापडले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला झोपायला गेल्या होत्या.
बारोट यांनी सांगितले की, जसुबेन यांचा मुलगा सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तिला भेटायला गेला आणि ती बेशुद्ध अवस्थेत दिसल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पीडितांना उलट्या झाल्या होत्या. घटनास्थळावरील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे खरे कारण अद्याप समजले नसले तरी तेथे गॅसवर चालणारे गिझर सुरू असल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला
जात आहे. बारोट म्हणाले की, आत्महत्येची शक्यता कमी आहे, मात्र पोलीस सर्व बाजूंचा तपास करत आहेत.