पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री जानकीरामन यांचे निधन

मंगळवार, 11 जून 2019 (10:11 IST)
पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते आर.व्ही.जानकीरामन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
 
वयाशी निगडीत आजारांमुळे जानकीरामन यांना काही दिवसांपूर्वी पुदुचेरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जानकीरामन यांची पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील राजकीय कारकिर्द प्रदीर्घ ठरली. ते पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी 1996 ते 2000 या कालावधीत मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी पुदुचेरीत द्रमुक-तामीळ मनिला कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते.
 
उदरनिर्वाहासाठी टॅक्‍सी चालक म्हणून सुरूवातीच्या काळात काम करणाऱ्या जानकीरामन यांनी राजकारणात उडी घेतल्यावर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी पुदुचेरी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही सांभाळली. त्यांच्या निधनाबद्दल पुदुचेरी सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी जानकीरामन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. विद्यमान मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जानकीरामन यांचे अंत्यदर्शन घेतले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती