फिजी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती, महामहिम रातु विलियम एम. काटोनिवेरे यांनी श्री श्री रविशंकर यांना 'ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' ही पदवी प्रदान केली. मानवी आत्म्याचे उत्थान, विविध समुदायांना एकत्र आणण्यासाठी आणि शांतता आणि सौहार्दाच्या क्षेत्रात केलेल्या अथक योगदानाबद्दल श्री श्री यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर त्यांच्या मानवतावादी कार्याच्या विशाल व्याप्तीसाठी मान्यता देण्यात आली असून गेल्या 43 वर्षांपासूनमानसिक आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला आणि युवा सशक्तीकरण आणि तणावमुक्ती आणि ध्यान कार्यक्रम या क्षेत्रातील त्यांच्या वैविध्यपूर्ण सेवेतून आनंद आणि सुसंवाद पसरवण्याचं काम केलं जात आहे.
फिजीच्या भेटीदरम्यान, श्री श्री यांनी राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे, फिजीचे उपपंतप्रधान, विल्यम गावोका आणि फिजीमधील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक डर्क वॅगनर यांच्यासह अनेक मान्यवरांची भेट घेतली. आर्ट ऑफ लिव्हिंग तरुणांना सक्षम बनवून बेट राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावू शकते, असे त्यांनी या नेत्यांना सांगितले.