मंदसौर जिल्ह्यातील शामगढ पोलीस स्टेशन हद्दीतील चंदवासा चौकी अंतर्गत असलेल्या रुंडी गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे प्रकाश बंजारा नावाच्या तरुणाने सुमन आणि विशाल या दोन मुलांसह झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आधी प्रकाशने आपल्या दोन मुलांना फाशी दिली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत त्याची पाहणी केली असता पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये याच गावातील राजू बंजारा, काळू बंजारा आणि गीताबाई आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोपी करण्यात आले आहे.नोट मध्ये तीन महिन्यांपूर्वी या लोकांनी माझी पत्नी नेनी हिला अमानुषपणे मारहाण केली होती आणि तिचे कपडेही फाडले होते, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेनंतर राजू बंजारा हा मला वारंवार धमक्या देत होता आणि माझ्याकडे पैसे आहेत, मी पोलिसांना खरेदी करू शकतो, असे सांगत होता.
प्रकाश व त्याच्या मुलांच्या आत्महत्येची माहिती मिळताच प्रकाशचे कुटुंबीय व ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले व त्यांनी आंदोलन सुरू केले. गावकरी पोलिसांना तिन्ही मृतांचे मृतदेह घेऊन जाऊ देत नाहीत. आरोपींवर कठोर कारवाई करून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.