एकनाथ शिंदे–देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर; अमित शहांबरोबर बैठक,

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (14:36 IST)
मुंबई – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
 
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळानेदेखील तीन दिवसांपूर्वी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अमित शाह यांनी या प्रकरणावर मध्यस्थी करण्याची आणि तोडगा काढण्याची विनंती केली होती.
 
दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गुजरातला गेले होते. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील उपस्थित होते. या दरम्यान अहमादाबाद विमानतळातील विशेष कक्षात शिंदे – फडणवीस आणि बोम्मई यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन तणाव सुरु झाल्यानंतर बोम्मई आणि शिंदे यांच्यातील ही पहिलीच भेट होती. या भेटीत सीमावादावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती समोर आली नाही. तसेच, शिंदे आणि बोम्मई यांच्या भेटीवर चर्चांना उधाण आल्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर उद्या अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.
 
महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा
सीमावादावरुन महाविकास आघाडीदेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. सीमावादाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकार गप्प असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी येत्या १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती