अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीनं केले 21 कोटी रुपये जप्त
शनिवार, 23 जुलै 2022 (19:09 IST)
पश्चिम बंगालमधील स्कूल सर्व्हिस कमीशन (एसएससी) भरती घोटाळ्यात ईडीने शनिवारी सकाळी पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पार्थ हे ममता बॅनर्जी सरकारमधील क्रमांक दोनचे नेते आणि उद्योगमंत्री आहेत.
अटक करण्याआधी ईडीने त्यांची जवळपास 27 तास चौकशी केली. पण त्यांच्या अटकेपेक्षाही चर्चा झाली ती अर्पिता मुखर्जी यांची. अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जी यांच्या विश्वासू मानल्या जातात. पार्थ चॅटर्जी हे तृणमूल काँग्रेसचे महासचिवही आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी यांच्या फ्लॅटमधून 21 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम गोणीत भरून कपाटात ठेवण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम भरती घोटाळ्याशी संबंधित असू शकते.
अर्पिता यांनाही अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार बॅकफूटवर गेल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येतंय.
पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेवर तसेच त्यांच्या कथित जवळच्या सहकारी अर्पिता यांच्या घरातून एवढी मोठी रक्कम जप्त केल्याच्या बातम्यांवर मुख्यमंत्री तसेच पक्षाने अद्याप काही भाष्य केलेलं नाही.
टीएमसी गप्प, ईडी काय म्हणते?
यापूर्वी ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला भाजपकडून करण्यात येणारी सूडबुद्धीची कारवाई असं म्हटलं जायचं. पण आता 'ठोस पुरावे' समोर आल्यानंतर यावर कोणीच काही बोलताना दिसत नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर अर्पिता आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यात जवळीक असल्याच्या चर्चा आणि अफवांनी वेग धरलाय.
शुक्रवारी संध्याकाळी पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी या रकमेचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं होतं. हा पैसा कुठून आला या प्रश्नाचं उत्तर संबंधित व्यक्तीकडूनच मिळेल ज्याच्याकडून ही रक्कम मिळाली. दुसरीकडे मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पार्थ चॅटर्जी यांच्या चौकशीला सूडाबुद्धीने सुरू असलेली कारवाई असं म्हटलं होतं.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अर्पिता यांच्या फ्लॅटमधून आतापर्यंत 50 लाख रुपयांच्या दागिन्यांसह 21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शिवाय 20 आयफोन आणि काही विदेशी रोकडही जप्त करण्यात आली आहे. एवढी सगळी रक्कम कुठून आली या प्रश्नावर अर्पिता कोणतंही समाधानकारक उत्तर देऊ शकलेल्या नाहीत."
अर्पिता यांनी केलंय चित्रपटांमध्ये काम
अर्पिता नेमकं असं काय करतात की त्यांच्याकडे एवढे पैसे आले? मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याशी त्यांचे संबंध कसे आहेत? यांसारखे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
अर्पिता यांनी दावा केलाय की त्या एक अभिनेत्री आहेत आणि अभिनय हेच त्यांच्या कमाईचं साधन आहे. ईडीच्या चौकशीत त्यांनी हा दावा केलाय. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरही स्वतःसाठी अभिनेत्री असं संबोधन वापरलं आहे.
अर्पिता यांनी 2005 मध्ये मॉडेलिंगनं करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बंगाली आणि उडिया चित्रपटांमध्येही काम केलं.
त्यांनी प्रसेनजीत स्टारर 'मामा-भाग्ने (मामा भांजा) आणि देव स्टारर 'पार्टनर' मध्ये महत्त्वाचे रोल केले आहेत. 2008 मध्ये आलेला 'पार्टनर' हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट होता.
अर्पिता यांची आई मिनाती मुखर्जी यांनी दावा केलाय की, त्यांच्या मुलीने उडीया आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलंय. अर्पिताने काही जाहिरातीही केल्या आहेत. तिने नेल आर्टचं ही ट्रेनिंग घेतलंय.