EC ने राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर केली, महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये 3 सप्टेंबरला मतदान

गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (08:14 IST)
केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 राज्यांमधून राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांसह राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य, मंत्री पियुष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रात दोन जागा रिक्त झाल्या आहेत. गोयल आणि उदयनराजे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका भाजपच्या तिकिटावर लढवल्या होत्या, त्यात त्यांचा विजय झाला होता.
 
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या राज्यसभेच्या जागांवर होणाऱ्या निवडणुकांसाठी 14 ऑगस्टला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 22 ऑगस्ट रोजी छाननी होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट तर बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशामध्ये उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. या सर्व जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होणार आहेत.
 
उदयनराजे आणि पियुष गोयल यांची जागा कोण घेणार?
पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जागी राज्यसभेवर भाजपकडून कोणाला संधी मिळणार? आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाआघाडीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही घटक पक्षाला भाजप संधी देणार का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
निवडणूक बिनविरोध होऊ शकते
या दोन्ही जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण विधानसभेत भाजपचे 106 आणि 15 अपक्षांसह 121 आमदार आहेत. यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जवळपास 90 आमदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
 
कार्यकाळ 2028 पर्यंत असेल
महाराष्ट्राचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्याशिवाय तेलंगणाचे केशवराव आणि ओडिशाच्या ममता मोहंता यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक होत आहे. 2025 ते 2028 या कालावधीत बाहेर जाणाऱ्या सदस्यांच्या उर्वरित कालावधीसाठी नवीन सदस्य निवडले जातील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती