मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय आता मराठी, कोंकणीसह गुजराती भाषेत

शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (08:03 IST)
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील निर्णय इंग्रजी भाषेतून मराठी, कोंकणी आणि गुजराती भाषेत भाषांतरित करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने इंग्रजीतील न्यायालयीन निर्णय स्थानिक भाषेत भाषांतरित केले जात आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी, गोव्याची राजभाषा कोंकणीमध्ये न्यायालयीन निर्णय उपलब्ध राहतील. गुजराती भाषेतही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयांचे भाषांतर केले जाईल.
 
२०२० साली सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन निर्णय स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू केले होते. इंग्रजी भाषेतून देशातील नऊ प्रमुख भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील निर्णय भाषांतरित करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाद्वारे सुवास सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भाषांतराचे कार्य करण्यात आले. याच धर्तीवर आता मुंबई उच्च न्यायालयातही एआयच्या मदतीने न्यायालयीन निर्णयांचे तीन भाषांत भाषांतर केले जात आहे.
 
अलिकडेच एआयद्वारा भाषांतरित निर्णयांची छाननी करण्यासाठी सेवानिवृत्त विधि अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. इंग्रजी भाषेतील निर्णय आणि भाषांतरित निर्णय यामध्ये तफावत राहू नये यासाठी हे विधि अधिकारी कार्य करतील. मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठाच्या निर्णयांचेदेखील भाषांतर केले जात आहे. ‘सध्या निवडक न्यायालयीन निर्णयांचे भाषांतर केले जात असून एआय सॉफ्टवेअर जसजसे अधिक प्रगत आणि चुकामुक्त होईल, तशी भाषांतरित निर्णयांची संख्या वाढेल. भाषांतर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. या कार्यासाठी विशेष समिती नेमली असून सर्व निर्णय समितीमार्फत घेतले जातात’, अशी माहिती नागपूर खंडपीठातील प्रशासन प्रबंधक रवींद्र सादराणी यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती