सोमवारी अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन क्षेत्रातील रौरी गावात पती, पत्नी आणि 3 मुलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने गावात खळबळ उडाली. मात्र त्यांनी आत्महत्या केली आहे की त्यांची हत्या करण्यात आली आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पुत्र जागर सिंह, राकेशची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी, मुलगा प्रकाश आणि अक्षय अशी मृतांची नावे आहेत. मृत राकेशचे काका त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. राकेशच्या काकांनी सांगितल्यानुसार, त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र कोणीही गेट उघडण्यासाठी आले नाही. मी फोन केला असता फोनही कोणी उचलला नाही. सकाळ झाली होती, राकेश झोपला असता तर त्याची बायको किंवा मुले कोणीतरी उठले असते, पण कोणाशीच संपर्क झाला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना विचारले असता त्यांनी सकाळपासून कोणालाही पाहिले नसल्याचे सांगितले. काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने त्यांनी ग्रामपंचायतीला माहिती दिली. सरपंच व पंचायत सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता पाचही जणांचे मृतदेह आढळून आले.