ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. हजारे यांचे सध्या उपोषण सुरु आहे. अण्णा माध्यमांसोबत बोलत होते तेव्हा ते म्हणाले की “लोकपाल आंदोलनामुळेच भाजपला सत्ता मिळाली आहे. तरही सत्तेत आल्यावर ते लोकपालबाबत काहीच बोलत नाहीत. २०१४ साली भाजपने माझा वापर केला होता. आता हे सरकार माझ्या मनातून उतरले आहे.”, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज व्यक्त केली.
लोकपालच्या नियुक्तीसाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा सहावा दिवस आहे. अण्णा हजारे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला आणि भाजपवर टीका केली आहे. माझ्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्या , असे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. मात्र हे साफ खोटे असून, माझ्या कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या मान्य झाल्या असत्या तर मी उपोषण कशाला सुरु ठेवले असते? आता हे सरकार उलथवून लावले तरी काहीही फरक पडणार नाही. सत्ता बदलून काहीही होणार नसून व्यवस्था बदलली पाहीजे.” अशी ठाम भूमिका अण्णा हजारे यांनी मांडली आहे.अण्णा हजारे यांना विचारला असता ते म्हणाले की, मी आणखी पाच दिवस उपोषण करु शकतो. माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही यावेळी अण्णांनी केला.