जगदीप धनकड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी
शनिवार, 16 जुलै 2022 (23:29 IST)
उपराष्ट्रपतिपद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित NDA कडून उमेदवारी देण्यात आली.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज (16 जुलै) संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी नड्डा म्हणाले, "भाजप आणि NDA कडून उपराष्ट्रपतिपदासाठी शेतकरी पुत्र जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. सुमारे 30 वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत."
जगदीप धनकड यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राजकीय प्रतिक्रिया
धनकड यांना उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी देम्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करून म्हणाले, "शेतकरी पुत्र जगदीप धनकड आपल्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे कायदेशीर, विधीमंडळाचा तसेच गव्हर्नर पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी नेहमीच शेतकरी, तरूण, महिला आणि वंचितांच्या भल्यासाठी काम केलं आहे. ते आमचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत, याचा मला आनंद वाटतो."
मोदी पुढे म्हणाले, "जगदीप धनकड यांच्याकडे संविधानाची चांगली माहिती आणि समज आहे. ते लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरण चांगल्या प्रकारे समजू शकतात. मला विश्वास आहे की राज्यसभेसाठी ते उत्तम अध्यक्ष सिद्ध होतील. देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने सभागृहाच्या कार्यवाहीचं नेतृत्व ते करतील."
पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक तसेच मेदिनीपूर येथून खासदार असलेले दिलीप घोष यांनीही ट्विट करून धनकड यांना शुभेच्छा दिल्या.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नुकतेच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले मुख्तार अब्बास नकवी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत होती. पण पश्चिम बंगालचे राज्यपाल धनकड यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने सर्वांना धक्का दिला.
त्याच मुख्तार अब्बास नकवी यांनीही जगदीप धनकड यांना शुभेच्छा दिल्या.
धनकड यांचा राजकीय प्रवास
जगदीप धनकड हे मूळचे राजस्थान येथील आहेत. ते 1989 ते 1991 याकालावधीत जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेचे खासदार होते. त्यापूर्वी 1993 ते 1998 दरम्यान त्यांनी राजस्थानच्या किशनगढ येथून विधानसभेचे आमदार होते.
सुरुवातीला व्यवसायाने वकील आणि नंतर नेते असा प्रवास केलेल्या धनकड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती 2019 मध्ये करम्यात आली होती. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी अनेक प्रसंगांमध्ये त्यांचे झालेले वादही अनेकवेळा समोर आले होते.