बिपरजॉय : एकीकडे चक्रीवादळ, पाऊस आणि दुसरीकडे 707 बाळांचा जन्म
शनिवार, 17 जून 2023 (17:47 IST)
तेजस वैद्य
BBC
"मयुरीला प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. आम्ही 108 क्रमांकावर कॉल करून अँब्युलन्स बोलावली. गुजरातच्या ओखापासून द्वारकेपर्यंत येताना रस्त्यात सोसाट्याचा वारा सुटला होता. अर्ध्या रस्त्यात थांबावं लागलं नाही म्हणजे मिळवलं, त्यामुळे पुढे काय होणार याची काळजी लागली होती."
द्वारकेच्या शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या मयुरी यांच्या आईंनी हा प्रसंग सांगितला.
ओखाच्या रहिवासी असलेल्या मयुरी यांनी द्वारकेच्या शासकीय रुग्णालयात 15 जून रोजी एका मुलीला जन्म दिला.
15 जूनच्या सकाळी 6.30 दरम्यान बिपरजॉय वादळ गुजरातमध्ये थडकलं. त्याच दरम्यान मयुरी यांना प्रसवकळा सुरू झाल्याने ओखापासून द्वारकेला रुग्णालयात नेलं जात होतं.
मयुरीचे भाऊ यश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "वादळ सुरु झाल्यामुळे आमचीही चिंता वाढली. पण तिची चिंता वाढू नये म्हणून वादळ आल्याचं मयुरीला सांगितलंच नाही. पण बाहेर सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि ती बेशुद्ध पडली. आम्ही कसंबसं दवाखान्यात पोहोचलो आणि ती सुरक्षित प्रसूती झाली."
रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका बिंदू म्हणतात, "मयुरी आली तेव्हाच खूप घाबरली होती, पुढे काय होणार याची तिला चिंता लागून राहिली होती. पण इथे सर्व सुविधा होत्या. आता सिझेरियन झालं असून बाळ आणि आई, दोन्ही सुरक्षित आहेत."
एका बाजूला वादळ, तर दुसऱ्या बाजूला प्रसूती
द्वारका शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विपुल चंद्राना म्हणाले की, वादळ येणार हे लक्षात घेऊन आम्ही रुग्णालयात सर्व व्यवस्था केली होती.
"आमच्याकडे एकूण 15 डॉक्टरांची टीम असून ते सर्व ड्युटीवर होते. गेल्या दोन दिवसांत 23 ते 24 प्रसूती झाल्या आहेत. सध्या चार ते पाच स्त्रियांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे."
15 जूनला वादळ सुरु असतानाच सीता नावाच्या एका महिलेने द्वारका येथील सरकारी रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
सीताच्या सासूबाईंनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, डॉक्टरांनी आम्हाला लवकर यायला सांगितल्यामुळे आम्ही सहा दिवस आधीच आलो होतो.
"आम्हाला इथे चांगल्या सुविधा मिळाल्या. एका बाजूला वादळ सुरू होतं तर दुसऱ्या बाजूला प्रसूती. पण सगळं सुरळीत पार पडलं."
विशेष म्हणजे वादळापूर्वी राज्य सरकारने केलेल्या तयारीमुळे 1171 गरोदर महिलांपैकी 1152 महिलांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश आलं. यातल्या 707 महिलांची प्रसूती वादळ सुरु असतानाच झाली.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सर्व गोष्टी सुरळीत पार पाडण्यासाठी 108 रुग्णवाहिका वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह तैनात करण्यात आल्या होत्या.
चक्रीवादळाचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये 100% डिझेलवर चालणाऱ्या 197 आधुनिक जनरेटर सेटची व्यवस्था करण्यात आली होती.
वादळाची तीव्रता लक्षात घेता, 108 रुग्णवाहिका तातडीने तैनात करण्यात आल्या होत्या. यात कच्छ जिल्ह्यात 10, देवभूमी द्वारकामध्ये 5 आणि मोरबीमध्ये 2 आणि 17 अतिरिक्त रुग्णवाहिका होत्या.
बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या रात्री उशिरा गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं. या वादळादरम्यान सोसाट्याचे वारे वाहू लागले आणि मुसळधार पाऊस पडला.
या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठं नुकसान झाल्याची नोंद आहे.