आदिवासी विभाग कार्यक्रमाला भुजबळांची उपस्थिती ?

शुक्रवार, 24 मार्च 2017 (23:35 IST)
आदिवासी विभागाचा कार्यक्रम नाशिकमध्ये होणार असून त्या करिता विभागाने निमंत्रण पत्रिका पाठवली असून त्यात उपस्थित मान्यवर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस येवला आमदार  छगन भुजबळ यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तुरुंगात असलेले भुजबळ कसे काय कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाचा ‘आदिवासी विकास पुरस्कार’ सोहळा २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नाशिकमधील महाकवी कालीदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
 
आदिवासी विकास विभागाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत भुजबळ यांच्या नावाचा उपस्थितांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या सोबत  संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास असणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या नावांमध्ये खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सुधीर तांबे, आमदार जयंतराव जाधव यांच्यानंतर आमदार छगन भुजबळ यांचेही नाव आहे. त्यामुळे आदिवसी विभागाला समजले की काय की भुजबळ बाहेर येणार आहेत असा मिश्कील प्रश्न विचारला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा