भजनलाल शर्मा : पहिल्यांदा आमदार ते थेट राजस्थानचे मुख्यमंत्री, जाणून घ्या प्रवास

मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (23:08 IST)
भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.तसंच, राजस्थानमध्ये दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा पक्षानं केली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनवलं जाणार आहे.
 
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला 199 पैकी 115 जागा मिळाल्या.
 
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून वसुंधरा राजे यांच्यासह अनेकांची नावं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे येत होती, मात्र अनेक आमदारांनी दावा केला होता की, मुख्यमंत्रिपदी आश्चर्यकारक नाव समोर येऊ शकतं.
राजस्थानसाठी भाजपचे निरीक्षक म्हणून भूमिका बजावणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "बैठकीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी एक प्रस्ताव मांडला. त्यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. किरोडीलाल मीणा, मदन दिलावर, जावर सिंह आणि संपूर्ण सभागृहाने या नावाला पाठिंबा दिला."
 
ते म्हणाले,"मला विश्वास आहे की, भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान प्रगतीच्या मार्गावर वेगानं वाटचाल करेल."
 
कोण आहेत भजनलाल शर्मा?
भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. राजस्थानच्या सांगानेरमधून निवडणूक जिंकून ते आमदार झाले आहेत.
 
शर्मा हे भाजप संघटनेतील महत्त्वाचा चेहरा मानले जातात. ते पक्षाचे संघटन मंत्री राहिले आहेत आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. ते भरतपूरचे रहिवासी आहे. त्यांचं वय 56 वर्षे आहे.
 
शर्मा यांनी जयपूरस्थित राजस्थान विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमएची पदवी घेतली आहे.
 
निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी 2022-23 मधील त्यांच्या एकूण उत्पन्नाचा तपशील 6,86,660 रुपये दिला आहे. तर या कालावधीत त्यांच्या पत्नीच्या नावावर घोषित केलेली रक्कम 4,27,080 रुपये आहे. त्यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे 1.4 कोटी रुपये आहे.
त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून जबरदस्तीनं रोखण्याशी संबंधित आहे.
 
शर्मा यांनी सांगानेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48 हजार 081 मतांनी पराभव केला होता. त्यांना एकूण एक लाख 45 हजार 162 मते मिळाली.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांच्यासाठी त्यांनी दीर्घकाळ काम केलं.
 
ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत आणि राज्यातील भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन (समन्वय) टीमचाही ते भाग आहेत. भाजपच्या गेल्या तीन-चार प्रदेशाध्यक्षांसोबतही त्यांनी काम केलं आहे.
 
सांगानेर हा जागा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. ही जागा जयपूर जिल्ह्यात येते. येथून पक्षाने विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांना तिकीट नाकारून भजनलाल शर्मा यांना तिकीट दिलं होतं.
 
या जागेवर भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. अशोक लाहोटी हे वसुंधरा राजे यांचे समर्थक मानले जातात.
 
लाहोटी यांना तिकीट नाकारल्यानं संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली होती.
 
'सर्व जातींना सामावून घेण्याचा प्रयत्न'
विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
 
शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी निवड हा भाजपचा सर्व जातींना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून अनेक लोक पाहत आहेत. भजनलाल शर्मा हे ब्राह्मण आहेत. तर दिया सिंह या राजपूत आणि प्रेमचंद बैरवा हे दलित समाजातील आहेत.
 
त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पत्रकारांनी हाच प्रश्न भाजपचे ज्येष्ठ आमदार किरोडीलाल मीणा यांना विचारला.
 
राजपूत, ब्राह्मण, दलित नेत्यांच्या माध्यमातून जातीय समीकरण साधण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला.
 
त्यावर मीणा म्हणाले, "आम्हाला जातींना साधण्याची गरज नाही. आमच्याकडे सर्वात मोठा चेहरा 36 समुदायांचा आहे, नरेंद्र मोदी. त्यांच्या नावावर आम्ही तीन राज्यात विजय मिळवला. पुढे 2024 मध्येही जिंकू."
 
56 वर्षीय भजनलाल शर्मा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत माध्यमांमध्ये चर्चेत नसेल. पण, भाजप संघटनेत त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
 
भजनलाल शर्मा यांच्या नावाच्या घोषणेनंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते किरोडी लाल मीणा यांनी पत्रकारांना सांगितलं की, त्यांनी आधीच संकेत दिले होते की मुख्यमंत्री म्हणून एक आश्चर्यकारक नाव समोर येईल.
 
ते म्हणाले, "मीणा ही भविष्यवेत्ता असतात. राजस्थानमध्ये आश्चर्यकारक निर्णय होईल, असं मी आधीच सांगितलं होतं."
 
मीणा म्हणाले, "भरतपूरला लोहगड म्हणतात. लोहगडमधील व्यक्ती लोहपुरुष बनून राजस्थानला पुढे घेऊन जाईल."
 
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये भाजपनं नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री केलं आहे. राजस्थानमध्ये असाच प्रकार घडला. राजस्थानमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर नऊ दिवसांनी ही घोषणा करण्यात आली आहे.
 
राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून मुख्यमंत्रिपद काँग्रेसचे अशोक गेहलोत किंवा भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांच्याकडे आहे.
 
मुख्यमंत्रिपदासाठी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप नेते आणि नवनिर्वाचित आमदार राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले, "पक्ष बराच विचार करून निर्णय घेतो. राजस्थान भाजपला भक्कम नेतृत्व मिळालं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो."
 
भाजपचे प्रदेश (राजस्थान) अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले, " ते (शर्मा) दीर्घकाळापासून पक्षाची सेवा करत होते. मुख्यमंत्रिपदासाठी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा झाली ही आनंदाची बाब आहे."

Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती