राजकोट गेम झोन आगीनंतर नातेवाईकांमध्ये संताप आणि हतबलता, प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? - ग्राऊंड रिपोर्ट

मंगळवार, 28 मे 2024 (19:49 IST)
जोरजोरात वाजणारा ॲम्ब्युलन्सचा सायरन, दुतर्फा लागलेल्या पोलिसांच्या गाड्या, प्रेतांचा जळकट- धुरकट वास आणि आपल्या प्रियजनांचा शोधात नातेवाईकांच्या आर्त किंकाळ्यांनी वातावरण भरून गेलं होतं.
 
राजकोटच्या नाना मावा रोडवरील टीआरपी गेम झोनमध्ये रविवारी (26 मे) दिवसभर हेच दृश्य पाहायला मिळालं. इथे शनिवारी (25 मे) संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू झाला.
 
या घटनेत मृत्युमुखी पडलेली मुले आणि पालक शाळेच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी या गेम झोनमध्ये आले होते. आता त्यांचे कुटुंबीय राजकोट सरकारी रुग्णालय परिसरात अत्यवस्थ अवस्थेत दिसत आहेत.
 
हा गेम झोन राजकोटच्या पॉश भागात, कलावाडमध्ये आहे. त्याच्या एका बाजूला आलिशान फ्लॅट्स, बंगले, बगीचा आणि मुख्य रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकोटचे प्रसिद्ध सयाजी हॉटेल आहे.
गेल्या काही वर्षांपासून इथे हा गेम झोन सुरू होता. गेम झोनमध्ये येणारे लोक आपली वाहनं समोरील मोकळ्या प्लॉटमध्ये पार्क करून मुख्य गेटमधून आत प्रवेश करत.
 
गेम झोनमध्ये प्रत्येक एका खेळासाठी वेगळे शुल्क आकारले जाते.
 
गेम झोनमध्ये बोलिंग ॲली, गो कार्टिंग यांसारखे खेळ मुलांच्या आकर्षणाचा विषय होते.
 
आत गेल्यावर लोखंडी रॉड आणि पत्र्याने बनवलेली दुमजली इमारत होती, त्यात विविध प्रकारचे खेळ खेळले जायचे. त्यामागे फूड झोन तयार करण्यात आला होता.
या गेम झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी जास्त शुल्क आकारलं जायचं, पण सुट्ट्यांच्या काळात हा दर उतरून एका विशेष योजनेअंतर्गत 99 रुपये इतका कमी केला होता.
त्यामुळे अपघाताच्या दिवशी गेम झोनमध्ये जास्त गर्दी होती.
अपघाताच्या 30 मिनिटे आधी ध्रुव गेम झोनमधून बाहेर पडला होता. त्याने बीबीसीला सांगितलं की, तो गेम झोनमध्ये असताना त्याने स्टीलच्या एका बाजूला वेल्डिंग होत असल्याचं पाहिलं होतं, त्याच्या ठिणग्या सहज खाली पडताना दिसत होत्या.
 
त्याने सांगितलं, "मी निघाल्यानंतर अर्ध्या तासाने मला काळा धूर दिसला. त्यामुळे आग लागल्याची मला खात्री पटली."
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय समोर आलं?
राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेचे चार सीसीटीव्ही व्हीडिओ बीबीसी गुजरातीने पाहिले आहेत, ज्यात ही आग कशी लागली हे दिसून आलं.
 
पहिले फुटेज संध्याकाळी 5 वाजून 33 मिनिटं 30 सेकंदाचे आहे. गेम झोनच्या आत वेल्डिंगचे काम सुरू असल्याचे दिसून आलं. ज्या ठिकाणी वेल्डिंग सुरू होतं त्या खाली फोम शीटचं एक मोठं पॅड ठेवलं होतं. सर्व प्रथम वेल्डिंगमधील स्पार्क या फोम शीटवर पडला.
 
पुढे 5 वाजून 34 मिनिटं 06 सेकंदाने या फोमच्या कव्हरमधून हलका धूर निघू लागतो. यानंतर लगेचच चार ते पाच जण धावताना दिसतात. हे लोक आग विझवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.
 
5 वाजून 34 मिनिटं 55 सेकंदानी तिथे ठेवलेले फोम शीट्स जळू लागतात. थोड्याच वेळात तिथे बरेच लोक जमतात. काही लोक तेथून उरलेले फोम शीट काढण्याचाही प्रयत्न करतात, पण त्यात त्यांना यश येत नाही. काही वेळातच आग वेगाने पसरू लागते.
दुसऱ्या फुटेजमध्ये एक व्यक्ती फायर एक्सटिंग्विशरने आग विझवताना दिसत आहे, पण त्याचाही फायदा होत नाही.
 
काही मिनिटांतच लोक इकडे तिकडे धावताना दिसतात. पुन्हा एकदा फायर एक्सटिंग्विशर आणले जाते, पण आग विझवण्यात लोकांना यश येत नाही आणि एका मिनिटात आग वेगाने पसरल्याचे दिसते.
 
'जळलेल्या अवशेषांचा आणि मृतदेहांचा वास'
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुण आणि लहान मुलांचा मोठा समावेश आहे. मोरबी पूल दुर्घटना आणि वडोदरा इथल्या हरणी तलाव दुर्घटनेप्रमाणेच सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.
 
ही एसआयटी या घटनेची कारणं आणि गेम झोन प्रवर्तकांच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करेल.
 
बीबीसी गुजराती टीम रविवारी सकाळी घटनास्थळी पोहोचली तेव्हा मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून राजकोट येथील सरकारी रुग्णालयात नेले जात होते.
 
आगीत मृतदेह जळाल्याने त्यांची ओळख पटवणं कठीण झालं होतं.
पाण्याच्या फवाऱ्याने विझवलेली आग आणि जळालेल्या मानवी मृतदेहांच्या दुर्गंधीने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं.
 
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, प्रसारमाध्यमं आणि लोकांची गर्दी दिसून आली.
 
रविवारी (26 मे) सकाळी गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घटनास्थळी पोहोचले.
 
रात्री सगळे मृतदेह बाहेर काढून झाल्याची खात्री केल्यावर बचाव पथकाने सहा बुलडोझरच्या मदतीने गेम झोनमधील ढिगारा हटविण्याची प्रक्रिया सुरू केली.
 
मात्र काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी बुलडोझर थांबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मानवी मृतदेहांचा शोध सुरू केला.
 
मात्र, भंगारात स्टीलचे पाईप आणि पत्र्यांव्यतिरिक्त काहीही दिसत नव्हते आणि ढिगारा हटवल्यानंतर केवळ राख आढळून आली.
 
राजकोट सरकारी रुग्णालयाच्या बाहेरचं वातावरण
राजकोटच्या सरकारी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळपासूनच लोकांची गर्दी पाहायला मिळत होती.
 
गेम झोनमध्ये गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आवारातच रात्र काढली.
 
रविवारी सकाळी देखील हे लोक नातेवाईकांच्या मृतदेहाची प्रतीक्षा करत होते. राजकोट सरकारी रुग्णालयाच्या गेटवर खासगी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
रुग्णालयाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीसाठी नातेवाईकांकडून नमुने घेतले होते, तर दुसऱ्या बाजूला मृतदेह ताब्यात कधी देणार? म्हणून कुटुंबीय वाट बघत होते. शवविच्छेदनासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आलं.
 
नंतर रुग्णालयाबाहेर जमलेली कुटुंबीयांची गर्दी हळूहळू वाढत गेली.
 
इथल्या रुग्णालयात असेही काहीजण भेटले जी शनिवारपासून तहान-भूक हरपून आपल्या प्रियजनांच्या शोधात तिथेच थांबून होते.
 
कुणी म्हणालं, "आमचा डीएनए नमुना घेण्यात आलाय आणि आम्ही तुम्हाला 24 तासांत फोन करून माहिती देऊ, असं सांगण्यात आलंय."
तर कुणी सांगितलं की, "गेम झोनमध्ये गेलेले आमचे नातेवाईक सरकारी रुग्णालयात आहेत की नाहीत याबाबत आम्हाला कोणतंही समाधानकारक उत्तर मिळत नाही. जर ते इथेच आहेत तर कोणत्या स्थितीत आहेत? आम्हाला हे प्रश्न सतत सतावत आहे, पण आम्हाला कोणत्याही प्राधिकरणाकडून काहीही उत्तर मिळत नाहीये."
 
चार मृतदेहांची ओळख - प्रशासन
आतापर्यंत चार मृतदेहांची ओळख पटली आहे. राजकोट सिटी एसपी राधिका भराई यांनी ही माहिती दिली.
 
राधिका भराई यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितलं की, "डीएनए नमुन्यांवरून चार मृतदेहांची ओळख पटली आहे. हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत."
 
"आम्ही कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहोत. मृतदेहांची ओळख पटल्यानंतर आम्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देऊ.
 
राधिका भराई पुढे म्हणाल्या, "आमच्याकडे कुटुंबातील सर्व सदस्यांचे संपर्क क्रमांक आहेत. एफएसएलकडून अहवाल मिळताच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू."
 
मंजुरी कशी मिळाली?
सरकारी रुग्णालयात काही वृद्ध लोक सतत रडताना दिसले. सोबत असलेले नातेवाईक त्यांचे सांत्वन करत होते.
 
दुसरीकडे, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राजकोट महापालिकेकडून अशा गेम झोनला मंजुरी कशी दिली, याचा अहवाल मागवला.
 
तसेच, राजकोट तालुका पोलिसांनी गेम झोनच्या व्यवस्थापकासह सहा जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304, 308, 337, 338 आणि 114 नुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
 
आरोपींमध्ये गेम झोनचे व्यवस्थापक युवराज सोळंकी आणि व्यवस्थापक नितीन जैन यांना अटक करण्यात आली आहे.
 
अपघातस्थळ असो की राजकोट सरकारी रुग्णालय, दोन्ही ठिकाणचं वातावरण दु:खाने भरून गेलं आहे.
 
माणसाच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत प्रियजन गमावल्याचा संताप असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल का, अशीही चिंताही व्यक्त होत आहे.
 
मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली एसआयटी पीडित कुटुंबीयांना किती लवकर न्याय मिळवून देणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती