सूत्रांप्रमाणे भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यामुळे जैशचे ठिकाणे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
उल्लेखनीय आहे की पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारताने 12 दिवसात पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेऊन पाकला त्याची जाग दाखवून दिली आहे.