सेक्युलर विचारसरणीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणारे केंद्रीय कौशल्य आणि विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्यावर निशाणा साधत त्यांना अभिनेते प्रकाश राज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा अनेकांचा गैरसमज आहे. इतर धर्मांचा आदर करणे, हा सेक्युलरिझमचा खरा अर्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनंतकुमार हेगडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सेक्युलर विचारसरणीच्या लोकांवर टीका केली होती. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी. कोणत्याही माणसाने त्याच्या धर्माप्रमाणे किंवा जातीप्रमाणे आपली ओळख मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, ब्राह्मण आहे, लिंगायत आहे अशी करून दिली तर मला निश्चितच आनंद होईल. अशा प्रकारे ओळख करून दिल्याने आत्मसन्मान प्रस्थापित होतो. मात्र, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवाणाऱ्या माणसांमुळेच समस्या निर्माण होतात. या सेक्युलर लोकांना त्यांचे आई-बापही ठाऊक नसतात, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी खुले पत्र लिहून अनंत हेगडे यांना प्रत्युत्तर दिले. सेक्युलर लोक निधर्मी असतात, हा निव्वळ एक गैरसमज आहे. मात्र, ते इतर धर्मांचाही आदर करतात. मात्र, तुम्ही लोकप्रतिनिधी असूनही एखाद्याच्या पालकांविषयी इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसे बोलू शकता, असा सवाल प्रकाश राज यांनी विचारला आहे.