5000 टन उडीद डाळीची आयात करणार

बुधवार, 8 जुलै 2015 (09:51 IST)
नवी दिल्ली- देशांतरागत किरकोळ बाजारपेठेतील उपलब्धता वाढावी व गगनाला भिडलेले भाव कमी होण्यासाठी केंद्र सरकार 5000 टन उडीद डाळीची आयात करणार आहे.
 
तूर डाळीसह इतर डाळींचे दर देशाच्या अनेक भागात शंभरीच पार गेले आहेत. 2014-15 च्या हंगामात डाळीच्या उत्पादनात 20 लाख टन घट झाल्याचे (जुलै-जून) स्पष्ट झाल्यानंतर डाळींचे भाव सतत वाढत आहेत. ग्राहक व्यवहार खात्याचे सचिव सी. विश्वनाथ यांनी सांगितले की, जूननंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नेहमीच वाढत असतात. यंदा डाळींच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. राज्यांच्या अन्नमंत्र्यांच्या परिषदेत विश्वनाथ बोलत होते. चांगला पाऊस आणि डाळींसाठी वाढविलेले हमी भाव यामुळे चालू खरीप हंगामात अधिक क्षेत्रावर डाळींची पेरणी अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. 2014-15 च्या हंगामात डाळींचे उत्पादन 17.38 दशलक्ष टनापर्यंत घसरले. गतवर्षी 19.25 दशलक्ष टन उत्पादन झाले होते. मार्च-एप्रिल महिन्यात आलेल्या पावसामुळे आणि वादळामुळे उत्पादन घटल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा