2जी प्रकरणी आजपासून जबाब नोंदला जाणार

सोमवार, 5 मे 2014 (10:56 IST)
2जी स्पेक्ट्रम वितरण प्रकरणात सीबीआयचे विशेष कोर्टात आजपासून (सोमवार) आरोपींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात करणार आहे. आरोपींमध्ये माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती ओ.पी. सैनी यांनी त्याआधी 17 आरोपींना 824 पानांतून 1718 प्रश्न विचारले होते. या आरोपींमध्ये राजा यांच्यासह द्रमुक खासदार कनिमोझी तसेच अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या तीन अधिकार्‍यांचे जबाब सोमवारी नोंदवण्यात येणार आहेत.

एस्सार ग्रुप आणि लूप टेलिकॉमच्या प्रवर्तकांचाही जबाब नोंदवला जाईल. एस्सार आणि लूप टेलिकॉमचा सहभाग असलेल्या प्रकरणातील आठ आरोपींना 645 प्रश्न विचारण्यात आले आहेत. 2008 मध्ये टूजी परवाना मिळवण्यासाठी संबंधितांनी लूप टेलिकॉमचा वापर करून दूरसंचार खात्याची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


दरम्यान, ‘माझ्याजवळ चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा आढळल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवण्यास तयार आहे.’ असे 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी दूरसंचारमंत्री ए.राजा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा