‘चलता है’वृत्ती सोडून द्या : मोदी

गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (11:08 IST)
‘चलता है’ ही वृत्ती आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांनी सोडून दिली पाहिजे, आणि संरक्षण खात्याचे जे प्रकल्प रखडले आहेत, ते लवकरात लवकर मार्गी लावून भारताला सार्‍या जगामध्ये संरक्षण सज्जतेबाबत आघाडीवर ठेवले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे संरक्षण खात्यातर्फे देण्यात येणार्‍या पुरस्कार वितरण समारंभामध्ये बोलताना केले.
 
संरक्षण क्षेत्रामधील तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलत चालले आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी जमवून घेण्यासाठी संरक्षण खात्यामधील तंत्रज्ञांनी सिध्द राहावे, अशी हाक मोदी यांनी दिली आहे.
 
भारतामध्ये तंत्रज्ञ व तज्ज्ञ यांची कमतरता नाही, आज त्यांना योग्य वाव देण्याची गरज आहे. आपले सरकार तदृष्टीने धोरणे आखत आहे, आपण याबाबत जगापेक्षा दोन पाऊले पुढे चालले पाहिजे. या कसोटीला संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी निश्चित उतरतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. संरक्षण खात्याने आतापर्यंतचे जे प्रकल्प हाती घेतले आहेत ते मुदतीपूर्व पूर्ण करण्यावर तज्ज्ञांनी कटाक्ष ठेवला पाहिजे. कारण मुदतीपूर्वी प्रकल्प पूर्ण झाल्यास खर्च व वेळेची बचत होते आणि या प्रकल्पांचा संरक्षण खात्याला उपयोग होतो हे मोदी यांनी तंत्रज्ञांच्या निदर्शनाला आणून त्यांनी याबाबत सरकारला मनापासून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. सार्‍या जगाने कौतुक करावे अशी शस्त्रसज्जता मिळवा. हे आव्हान तुम्हाला खुणावत आहे, त्याला धैर्याने सामोरे जा, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा