हिंसाचाराच्या छायेत चर्चा शक्य नाही- कृष्णा

हिंसाचाराच्या छायेत पाकिस्तानबरोबर शांतता चर्चा शक्य नसल्याचे आज भारताने स्पष्ट केले. पाकबरोबरच्या संयुक्त जाहिरनाम्यातही तसेच नोंदविले आहे, असेही सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी आज हे स्पष्टीकरण दिले.

राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात कृष्णा बोलत होते. हिंसाचारी घटना सुरू असल्या तरी उभय देशातील चर्चा थांबवायला नको, असे डॉ.मनमोहनसिंग व गिलानी यांनी शर्म अल शेख येथे प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले होते. मात्र, सरकारची नेमकी भूमिका काय हे कृष्णा यांनी आज स्पष्ट केले. दहशतवादाच्या सातत्यपूर्ण छायेत अशी चर्चा शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची भूमिका या निवेदनातही स्पष्ट करण्यात आली असून, आपल्या भूमीचा भारताविरूद्ध कारवाया करण्यासाठी वापर करू देऊ नये, असे वचन पाकने पाळले तरच चर्चा सुरू राहिल असे कृष्णा यांनी सांगितले.

शर्म अल शेख येथे प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात त्रुटी असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी अटलबिहारी वाजपेयींची स्तुती केली तरी या त्रुटींकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असे विरोधी पक्ष नेते अरूण जेटली यांनी स्पष्ट करून हा मुद्दा चर्चेला आणला होता. दहशतवादाविरोधात पाकवर निर्माण केलेला दबाव या निवेदनातून निघून गेल्याचा आरोपही कृष्णा यांनी फेटाळला.

वेबदुनिया वर वाचा