हरियाणात पहिला पंजाबी मुख्यमंत्री

बुधवार, 22 ऑक्टोबर 2014 (12:11 IST)
मनोहरलाल खट्टर यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड 
 
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने करनाल विधानसभा मतदारसंघातून प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले मनोहरलाल खट्टर यांच्या गळ्यात हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत खट्टर यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. खट्टर हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या खास मर्जीतील मानले जातात.
 
खट्टर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, अशा जबाबदार्‍या सांभाळलेल्या आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आणि स्वच्छ प्रतिमा या खट्टर यांच्यासाठी सर्वात जमेच्या बाजू ठरल्या. शिवाय खट्टर हे पंजाबी आहेत. त्यांच्या रूपाने जाटांचे वर्चस्व असलेल्या हरियाणाला पहिला पंजाबी मुख्यमंत्री दिल्यास पंजाब आणि दिल्लीमध्ये भाजपला त्याचा ङ्खायदा होऊ शकतो, असे गणितही भाजप नेतृत्वाने डोक्यात ठेवले आहे. वयाची साठी ओलांडलेले खट्टर हे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विश्वासातील आहेत. मोदी हरियाणामध्ये भाजपचे प्रभारी असताना खट्टर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे खट्टर यांचे पारडे आधीपासूनच जड होते. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि भाजप उपाध्यक्ष दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच खट्टर यांचे नाव विधिमंडळ नेतेपदासाठी समोर ठेवण्यात आले आणि त्यावर एकमताने शिक्कामोर्तबही करण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा