सक्तीच्या धर्मांतराबाबत संघावर होणारी टीका अनावश्क - शहा

सोमवार, 22 डिसेंबर 2014 (10:16 IST)
संघ परिवारामधील काही संघटनांनी सक्तीने धर्मांतर केल्यावरून जो वाद निर्माण झाला आहे, तो अनावश्क असल्याचे  मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. अशा घटनांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आपल्या विकासाच्या मुद्दय़ापासून मुळीच मागे हटणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी दिली आहे.
 
सक्तीने धर्मांतर करण्याबद्दल भाजपने आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. त्यामुळे देशाची विकास व प्रगती यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मत शहा यांनी व्यक्त केले आहे. सक्तीने धर्मांतर करण्याची काही हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रयत्नामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या विकासाच्या कार्यक्रम अंमलबजावणीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व ती निर्विघ्नपणे पार पडेल, असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
 
सक्तीच्या धर्मांतरामध्ये राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या नेत्याचा हात आहे का? या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. राष्ट्रीय स्वंसेवक संघ ही राष्ट्रीय संघटना असून तिचे कार्य निश्चितच देशहिताचे व समाजहिताचे असल्याचा निर्वाळा शहा यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा