संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (17:17 IST)
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 'सोसायटी फॉर रिसर्च अँण्ड इनिशिएटिक्स फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीस अँण्ड इन्स्टिट्यूटन्स' (सृष्टी) तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक संशोधक विद्यार्थ्यांना जीवायईटीआय.टेकपीडिया.इन या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येईल. या नोंदणीसाठीचे अर्ज ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्वीकारले जातील.
 
स्पर्धेतील विजेत्यांचा मार्च २०१७ मध्ये राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वेगवेगळे गट आहेत. एकाच स्पर्धकाला विविध गटांत एकापेक्षा अधिक शोधसुद्धा सादर करता येतील. कमीत कमी खर्चात चांगले उपकरण आणि तंत्रज्ञान विकसित करणे, समाजात बदल घडून आणणारे नवीन तंत्रज्ञान सादर करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे इत्यादी निकषांवर विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा