वांशिक टीकेमुळे इंडियन ऑयड़लचे भक्त रस्त्यावर

दार्जिलिंगच्या प्रशांत तमांगने इंडियन ऑयडॉल स्पर्धा जिंकून आठवडा होत नाही तोच त्याच्या चाहत्यांनी स्थानिकांशी संघर्ष निर्माण करून नवीन वादाला सुरूवात केली. दिल्लीच्या एफ. एम. रेडिओ केंद्राच्या एका जॉकीने कथितरित्या प्रशांतच्या संदर्भात वांशिक टिपण्णी केल्याच्या निषेधार्थ जवळपास दोन हजार चाहत्यांनी सिलिगुडीतील रस्त्यावर उतरून निदर्शने केली. परिस्थिती चिघळून तिला हिंसात्मक वळणही मिळाले.

तमांगच्या बहुतांश नेपाळी चाहत्यांनी स्थानिकांशी व पोलिसांशी संघर्षाची भूमिका घेतल्यावर सिलिगुडीत हिंसेचा भडका उडाला. या संघर्षात दोन जणं गंभीर जखमी झाले तर कित्येकांना किरकोळ दुखापती झाल्या. हिंसेनंतर शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून लष्करास पाचारण करण्यात आले आहे.

निमलष्करी दल व पोलिसांच्या तुकड्या सर्वत्र तैनात करण्यात आल्या आहेत. हिंसक जमावास पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्यासोबतच अश्रूधुराच्या नळकाड्याही फोडाव्या लागल्या. तमांग कोलकता पोलिस दलात कार्यरत आहे. देशभरात प्रसिद्धीचे शिखर गाठलेल्या इंडियन ऑयडॉल स्पर्धेत त्याने मेघालयाच्या अमित पॉलवर बाजी मारत विजेतेपद पटकावले होते.

वेबदुनिया वर वाचा