लखनौमध्ये शिया आंदोलकांवर लाठीचार्ज, एकाचा मृत्यू

शनिवार, 26 जुलै 2014 (10:22 IST)
उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांचा पायउतार करावा, या मागणीसाठी लखनौमध्ये शिया आंदोलक रस्त्यावर उतरले होते. आझम खान वक्फ बोर्डाला संपवण्याच्या प्रयत्न करत असल्याचे शिया आंदोलकांचे म्हणणे आहे. आझम खान यांचा निषेध म्हणून शिया आंदोलकांनी आंदोलन केले. परंतु पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांचा डाव हाणून पाडला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. 
 
अलविदा जुम्माचा नमाज पठण केल्यानंतर मौलाना कल्बे जव्वाद यांनी हजारो अनुयायांना घेऊन शिया वक्फ बोर्डमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने केली. वक्फमंत्री आझम खान यांच्या विरोधात जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. काही क्षणात दगडफेकही झाली. पीएसीच्या गाडीसह तीन मोटारसायकली जमावाने पेटवल्या. संतप्त जमावाने पत्रकारांचे कॅमेरे फोडले तसेच त्यांनाही मारहाण केली. 
 
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात एकाचा मृत्यू झाला. तसेच 10 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन मौलानांचा समावेश आहे. कर्रार मेहंदी रिझवी (55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रिझवी याला जखमीवस्थेत ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 
रिझवी याच्या मृत्यूचे वृत्त समजतात जमाव आणखी भडकला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. रिझवी यांच्या मारेकर्‍यांना अटक करा, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा आंदोलन सुरुच ठेवू असा इशारा शिया आंदोलकांनी दिला आहे. 

वेबदुनिया वर वाचा