येड्डियुरप्पा यांचा राजीनामा!

वेबदुनिया

शुक्रवार, 29 जुलै 2011 (16:22 IST)
खाण कंपन्यांकडून तब्बल ३० कोटींची बिदागी स्वीकारल्याचा ठपका लोकायुक्त संतोष हेगडे यांनी ठेवल्यानंतर तातडीने दिल्लीला रवाना झालेल्या येड्डियुरप्पा यांनी पक्षनेतृत्वाला हे आरोप जुनेच असून त्याविषयी सुप्रीम कोर्टात विविध याचिका प्रलंबित असल्याचे सांगत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा खुलासा पक्षाने अमान्य केल्यानंतर गुरुवारी बेंगळुरूला परतताच येड्डियुरप्पा यांनी शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला. त्यांच्या निवासस्थानी कर्नाटक भाजप आपल्याच पाठीशी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.

मात्र सकाळी दिल्लीत भाजपने लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत संसदीय मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा त्वरित राजीनामा देण्याची सूचना येड्डियुरप्पांना करण्याचा एकमताने निर्णय झाल्याची माहिती पक्षप्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी दिली. आज, शुक्रवारी राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. भाजप नेतृत्वाच्या या ठाम निर्णयामुळे अखेर सायंकाळी पाचच्या दरम्यान येड्डियुरप्पा यांनी गडकरी यांच्याकडे पदत्याग करण्याची तयारी दर्शवली. आज, शुक्रवारी कर्नाटक विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्याची निवड होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा