मुंडें अजुनही नाराजच!

गुरूवार, 30 जून 2011 (12:09 IST)
ND
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे ‘मानापमान’ नाट्य संपून आता दोन आठवडे उलटत आहेत. मुंडेंनी अचानक उपसलेली बंडाची तलवार त्यांना पुन्हा म्यान करावी लागली आहे.

मुंडेंचे बंड आणि तितक्यात घाईने त्यांनी घेतलेली माघार हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. मुडेंचे दिल्ली गाठणे, अहमद पटेल यांना भेटणे, विलासराव देशमुख यांची भेट घेतल्यावर थेट भुजबळांचे बळ आजमावणे या सार्‍या घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मुंडेंची नाराजी दूर करण्‍याची तयारी भारतीय जनता पक्षाने दाखवली असली तरी अद्याप त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्‍यात न आल्याने मुंडेंची अस्वस्थता वाढत आहे.

एकीकडे कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्‍यासाठी वाढता दबाव आणि दुसरीकडे कॉंग्रेसकडून करण्‍यात आलेली उपेक्षा या सार्‍यांनी मुंडे हताश झाले आहेत. सुषमा स्वराज यांनी मुंडेंची मनधरणी करत त्यांना सार्‍या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

या आश्‍वासनावर विश्वास ठेवत मुंडेंनी आपली तलवार म्यान केली खरी, परंतु आता मात्र पुन्हा त्यांची अस्वस्थता वाढलआहे. भाजपमध्येच रहाण्‍याचा आपला निर्णय चुकला का? हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

स्वराज यांच्या आश्वासनानंतरही अद्याप पक्षाच्या एकाही राष्ट्रीय नेत्याने मुंडेंची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्‍याची तसदी घेतलेली नाही.

देशात महागाईचा भस्मासूर वाढल्याने विरोधीपक्षांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचे निमित्त करत भाजपने मुंडेंना पुन्हा एकदा सपशेल डावलण्यास सुरुवात केली आहे. त्यांची नाराजी दूर करण्‍यासाठी आयोजित करण्‍यात आलेली बैठक झालीच नाही.

मुंडेंच्या मागे नेमके कोणते आमदार आणि नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत होते त्यांची यादीच करण्याच्या सुचना पक्ष श्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुंडे यांना शह देण्यासाठी दुसरा नेता कोण असू शकेल याचीही चाचपणी करण्‍यात येत आहे.

स्वराज यांनी मुंडेंची मनधरणी केल्याचे बोलले जात असले तरी मुंडेंची नाराजी दूर करण्‍याच्या निमित्ताने स्वराज यांनीही आपली दुखणी मुंडेंच्या पुढ्यात मांडलीत. अरुण जेटली आणि ‍नितिन गडकरी यांच्याकडून आपल्याला सातत्याने डावलले जात असल्याचे स्वराज यांना वाटत आहे. त्यामुळे पुढील काळात आपल्यासोबत मुंडेंचे बळ असावे यासाठी स्वराज यांनी मुंडेंची नाराजी दूकरण्‍यासाठी पुढाकार घेतला.

मुंडे मुरलेले राजकारणी आहेत. स्व.प्रमोद महाजन यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले आहेत. ते इतक्यात माघार घेणार नाहीत, किंवा हारही मानणार नाहीत.

आगामी काळात राज्यात नगरपालिका, महापालिका निवडणूका होत आहेत. मुंडेंनी आता महाराष्ट्राचा दौरा करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय पक्षासाठी धोकादायक ठरु शकतो असे त्यांच्या विरोधी गटातील नेत्यांना वाटते, त्यामुळे ते आता मुंडेंचा हा दौरा अयशस्वी करण्‍याच्या तयारीला लागले आहेत.

मुंडेंनी दिल्लीत पत्रकारांसमक्ष आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी मुंडे हे अद्यापही नाराजच आहेत. आगामी काळात पक्षाने त्यांच्याकडे अशाच प्रकारे दुर्लक्ष केल्यास मुंडे पक्षाला रामराम करतील हे मात्र निश्चित.आणि त्यावेळी त्यांच्या मागे नाराजांची फौज असेल.

वेबदुनिया वर वाचा