मानव घालणार अवकाशाला गवसणी

शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (11:43 IST)
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज मानवाला घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या कुपीचे अवकाशात प्रक्षेपण करण्याची चाचणी यशस्वी केल्याने मानवाला अवकाशात पाठविण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रात जीएसएलव्ही मार्क-3 या सर्वांत जड रॉकेटच्या साह्याने कुपीचे अवकाशात प्रक्षेपण करण्याची चाचणी घेण्यात आली.  कुपी अवकाशात पाठविल्यानंतर ७३० सेकंदांनंतर अपेक्षेनुसार बंगालच्या उपसागरात पडली. समुद्रात पडण्याआधी ही कुपी रॉकेटपासून वेगळी करण्यात आली होती. आग्रा येथील संरक्षण संशोधन विकास संस्थेने विकसित केलेल्या विशेष पॅराशूटच्या साह्याने ही कुपी अंदमान निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंटपासून १८०  किलोमीटर अंतरावर समुद्रात पडली. या कुपीची आज चाचणी घेताना यात अवकाशवीर नव्हते, तरी त्यांना अवकाशात नेण्याची या कुपीची क्षमता तपासण्यासाठीच घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी ठरली.

वेबदुनिया वर वाचा