मध्य प्रदेशात बसला अपघात : ५0 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

मंगळवार, 5 मे 2015 (10:38 IST)
मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एका भीषण अपघातात ५0 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अनुप ट्रॅव्हल्सची एक खासगी बस अनियंत्रित होऊन पांडवपाल येथील छोट्याशा पुलावरून नदीमध्ये पलटली. त्यानंतर बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये उसळलेला आगडोंब इतका भयानक होता की बसमधील सर्व प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाला.
 
पोलीस महाअधीक्षक आर.डी. प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, छतरपूरहून सतना जिल्ह्याकडे जात असताना पन्ना जिल्ह्यात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास १६ फूट खोल नदीत ही बस अनियंत्रित होऊन कोसळली. बसमध्ये इंधन मोठय़ा प्रमाणावर भरले होते. त्यामुळेच स्फोट घडल्याची शक्यता आहे. काही क्षणातच पलटी झालेल्या बसमध्ये आगडोंब उसळला. धगधगत्या बसमधून प्रवासी बाहेर पडू न शकल्याने ५0 जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. या बसमध्ये साधारणत: ५0 प्रवासी होते आणि ते सर्व मृत्युमुखी पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पन्नाचे जिल्हाधिकारी शिवनारायण चौहान यांनी मृतांच्या संख्येबाबत दुजोरा दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री मदतनिधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना प्रत्येकी ५0 हजारांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा