बदलासाठी लोकसहभाग आवश्यक

मंगळवार, 9 फेब्रुवारी 2016 (12:55 IST)
ग्रामीण भागामध्ये बदल घडविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ग्रामीण विकास स्नातक या राष्ट्रीय योजनेंतर्गत देशाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या 200 हून अधिक तरुणांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
 
यावेळी या योजनेस अधिक प्रभावी बनविण्याकरिता सल्ला वा सूचना सुचविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या प्रतिनिधींना केले. याचबरोबर, देशातील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी वचनबद्ध झालेल्या या प्रतिनिधींचे पंतप्रधानांनी कौतुकही केले. या प्रतिनिधींशी झालेल्या संवादानंतर बोलताना मोदी यांनी लोकसहभाग हे या विकासात्मक चर्चेमधील सामाईक सूत्र असल्याचे मत व्यक्त केले.
 
या प्रतिनिधींपैकी 11 निवडक प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छ भारत, एक भारत- श्रेष्ठ भारत अशा विविध संकल्पनांवर आधारलेल्या कामाचे पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले. यानंतर पंतप्रधानांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
 
‘पीएमडीआरएफ’ ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना असून ती राज्य सरकारांच्या सहकार्याने राबविली जाते. भारतामधील ग्रामीण व मुख्य भूभागाशी पूर्णत: जोडल्या न गेलेल्या भागामधील गरिबीचे निर्मूलन हे योजनेचे उद्दिष्ट आहे.
 

वेबदुनिया वर वाचा