पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ

मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (11:41 IST)
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर सोमवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री  म्हणून अण्णाद्रमुकचे नेते ओ. पन्नीरसेल्वम यांनी शपथ घेतली. पन्नीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली होती. 
 
बंगळुरू विशेष न्यायालयाच्या निर्णयामुळे जयललिता आमदार म्हणून अपात्र ठरल्या आणि त्यांना मुख्यमंत्रिपदही गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ पक्षाची रविवारी सायंकाळी चेन्नईमधील पक्षाच्या कार्यालयात बैठक झाली आणि जयललितांकडून आलेल्या सूचनेनुसार पन्नीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पन्नीरसेल्वम यांनी आपल्या ज्येष्ठ सहकार्‍यांसह राजभवन येथे जाऊन राज्यपाल के. रोसय्या यांची भेट घेतली आणि त्यांना निवडीबाबतचे पत्र दिले होते. अखेर आज त्यांना राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
 
तुरुंगात जाण्यापूर्वी जयललिता यांनी पन्नीरसेल्वम यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतरच आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली होती. राजकीय वतरुळात ‘ओपीएस’ म्हणून ओळखले जाणारे पन्नीरसेल्वम दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा