दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही : केंद्र

बुधवार, 6 मे 2015 (10:33 IST)
कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असून कराचीत वास्तव्यास असल्याच्या स्वत:च्याच वक्तव्यावरून केंद्रातील भाजप सरकारने कोलांटउडी मारली. ‘दाऊद नेमका कुठे लपला आहे? त्याचा सध्याचा ठावठिकाणा काय आहे? याबद्दल भारत सरकारला अजिबात कल्पना नाही,’ असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज संसदेत स्पष्ट केले. 
 
गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दाऊद पाकिस्तानातच असल्याचे म्हटले होते. तसेच भारत सरकारने त्यांच्या कराचीतील वास्तव्याचे सर्व पुरावे पाकिस्तानला दिले आहेत, असे सांगण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तान दाऊदला आश्रय देत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता सरकारने अचानक पलटी मारली आहे. सीबीआयच्या माजी अधिकार्‍याने लिहिलेल्या एका पुस्तकात दाऊदच्या शरण येण्याच्या इच्छेबाबत सविस्तर लिहिले आहे. हे लिखाण प्रकाशात आल्यापासून पुन्हा एकदा दाऊदच्या ठावठिकाणाची व शरणागतीची चर्चा सुरू झाली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा