तेलंगणातून राहुलची पदयात्रा

शनिवार, 16 मे 2015 (10:15 IST)
तेलंगणा। शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी आदिलाबाद जिल्ह्यातील कोराटीकल गावातून 15 किलोमीटरच्या पदयात्रेला प्रारंभ केला.
 
12 लाखांचे कर्ज झाल्याने आत्महत्या केलेल्या वेल्मा राजेश्वर यांच्या कुटुंबीयांचे राहुल गांधी यांनी सांत्वन केले. राजेश्वर यांची विधवा पत्नी गंगव्वा हिला त्यांनी दोन लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला. राहुल गांधी या पदयात्रेत लक्ष्मणचंदा, रचापूर, बाडीपल गावातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. वाडीयल येथे राहुल गांधी शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.
 
तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा निर्णय संपुआ सरकारने घेतलेला असूनही गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला लाभ उठविता आला नाही. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीने सत्ता हस्तगत केली होती. 
 
राहुल यांच्या पदयात्रेवर तेलंगणा राष्ट्र समितीने आक्षेप घेतला असून हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी म्हटले आहे की, भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशाला सशक्त विरोधी पक्षाची गरज आहे.
 

वेबदुनिया वर वाचा