तर एक हजारांच्या नोटांवर दिसणार डॉ. कलाम!

गुरूवार, 30 जुलै 2015 (11:21 IST)
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेलाय. त्यांनी आपल्या कृत्यातून दिलेली शिकवण आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जाग्या राहाव्यात, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. याचसाठी, सोशल मीडियावरदेखील एक उपक्रम सुरू करण्यात आलाय. 
 
डॉ. कलाम यांचा फोटो एक हजारांच्या नोटांवर पाहायला मिळावा, अशी इच्छा या उपक्रमाद्वारे व्यक्त करण्यात येतेय. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे अभियान दिल्लीत सदनापर्यंत पोहोचलं तर कदाचित ही इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकेल.. आणि हे घडलं तर भविष्यात महात्मा गांधी यांच्यासोबतच डॉ. ए पी जे अब्दुल कलाम हेदेखील आपल्याला नोटांवर पाहायला मिळू शकतील. 
 
तसंच, उत्तरप्रदेशच्या तांत्रिक विद्यापीठाकडून प्रेरणा घेऊन केरळच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयांना एकत्रित आणण्यासाठी इथं सरकारी खर्चानं तांत्रिक विद्यापीठाची निर्मिती होतेय. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर केरळच्या विद्यार्थ्यांनीही एक सोशल मीडिया अभियान सुरू केलंय. यामध्ये, केरळच्या तांत्रिक विद्यालयाचं नाव ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी’ असं नामकरण व्हावं, यासाठी हे विद्यार्थी आग्रही आहेत.

वेबदुनिया वर वाचा