जयललिता यांचा आज शपथविधी

शनिवार, 23 मे 2015 (09:58 IST)
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून सुटका झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या नेत्या जे. जयललिता पुन्हा एकदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी   आपल्या पदाचा राजीनामा दिला. जयललिता आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
 
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरून शिक्षा झाल्यानंतर जयललिता यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी जयललिता यांच्या मर्जीतील पन्नीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. मात्र जयललिता यांनी त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणातून सुटका केल्यानंतर त्या पुन्हा मुख्यमंत्रिपदी येणे निश्चित मानले जात होते. त्यानुसार, पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अवघ्या पाच मिनिटांच जयललिता यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. जयललिता या चौथ्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 

वेबदुनिया वर वाचा