जम्मूत पोलिसांवर तुफान दगडफेक; ईदच्या उत्साहाला गालबोट

मंगळवार, 29 जुलै 2014 (17:38 IST)
ईद- उल- फितरच्या पावन पर्वावर जम्मू-कश्मीरमध्ये पोलिसांवर तुफान दगडफेकीची घटना घडली आहे. ईदचा नमाज अदा केल्यानंतर युवकांच्या एका गटाने तुफान दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. इस्रायलकडून गाझा पट्टीवर झालेल्या हल्ल्याचा जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी विरोध करण्‍यात आला. काही ठिकाणी हिंसक वळणही लागल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदचा नमाज अदा केल्यानंतर अचानक काही युवक रस्त्यावर उतरले. गाझा पट्‍टीवर होणार्‍या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्‍यात आले. परंतु काही ठिकाणी काही युवकांनी दगडफेक केली. श्रीनगरमधील हैदरापोरा आणि मौलाना आझाद रोडवर तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
 
हुर्रियत कॉन्फरन्सने युवकांना चिथविल्याने दगडफेकीच्या घडना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहर, अनंतनाग जिल्ह्यातील जंगलात मंडी भाग तर शोपियां शहरात दगडफेकीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. 

वेबदुनिया वर वाचा