छोटा शकील म्हणाला, टायगरने केलेल्या गुन्हाची शिक्षा याकूबला का?

शुक्रवार, 31 जुलै 2015 (15:10 IST)
मुंबईत साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीमुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलने धमकी दिली की भारताला याकूबच्या फाशीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये फोनवरून संवाद साधत छोटा शकीलने म्हटले की याकूब मेमनला न्याय मिळाला नाही. याकूब निर्दोष होता, म्हणून तो दयेसाठी फिरत राहिला, पण कोणीही त्याच्यावर दया दाखवली नाही. शकीलने मुंबई हल्ल्यासाठी याकूबचा   मोठा भाऊ टायगर मेमनला जबाबदार ठरविले आहे.  

तो पुढे म्हणाला की याकूबवर हा गुन्हा थोपण्यात आला होता. त्याने कबूल केले नव्हते. त्याच्यावर हा गुन्हा यासाठी म्हणून थोपण्यात आला होता कारण त्याने टायगरचे ठिकाण सांगितले नव्हते.  

या गँगस्टरने सांगितले की आता 'डी' कंपनी किंवा इतर कोणत्याही गँगमधील व्यक्ती भारत सरकारच्या आश्वासनांना बळी पडणार नाही की कोणत्याही ऑफर्सचा विचार करणार नाही. 'जर त्यावेळी दाऊदही भारतात आला असता तर त्याचाही असाच छळ झाला असता म्हणूनच तो भारतात आला नाही' असेही शकील म्हणाला.  

शकीलने हे ही म्हटले की हल्ल्यांमध्ये दाऊद इब्राहिमचे काहीच घेणे देणे नाही आहे. याकूबने देखील दाऊदचे नाव घेतले नव्हते. दाऊद भारतात परत येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा