केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले

सोमवार, 5 मे 2014 (12:04 IST)
नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे वर्षभर बंद असलेले केदारनाथ मंदिर रविवारपासून पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

सकाळी आठ वाजता मंदिरात झालेल्या आरतीने भगवान केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. एक वर्षभरापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे केदारनाथ मंदिरासह उत्तराखंडमध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा मंदिर भाविकांसाठी खुले झाले असून, मंदिरापर्यंत जाण्यासाठी नवा रस्ता बनविण्यात आला आहे. मंदिराच्या आसपास चार ते पाच फूट बर्फाचे थर साचले असले तरी प्रशासनाने रस्ते बनविले आहेत. भाविकांच्या मनात अद्याप भीतीचे वातावरण असले, तरी काही भाविक उत्साहाने येथे येत आहेत.

यात्रेकरूंची सुरक्षा आणि चारधाम यात्रेपूर्वी सर्व सुविधांची पुनर्रचना करून लोकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. यंदा प्रसिद्ध केदारनाथ यात्रेसाठी आणि या भागातील इतर तीर्थस्थळांना कमी गर्दी होण्याची शक्यता आहे. नागरिकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असून, त्यासाठी सर्व उपाययोजना केली आहे. मात्र तरीही लोकांना निसर्गाची भीती बसल्याने यात्रेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा