काळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक

बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (11:39 IST)
देशाच्या बाहेरील काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.
 
केंद्राने काळा पैसा परत आणण्याबाबत संसदेत माहिती द्यावी, अशी मागणी तृणमूलच्या खासदारांकडून करण्यात आली. तसेच तृणमूलच्या खासदारांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मान्य न केल्याने विरोधकांनी गोंधळ घातला.
 
दरम्यान, संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सरकार सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे म्हटले आहे. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभेतही काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
 
काळा पैशाबाबत तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि संयुक्त जनता दलाच्या (जदयू) खासदारांनी संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी निदर्शने केली. तृणमूलच्या खासदारांनी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. नंतर या आंदोलनात सप व जदयूचे खासदार सहभागी झालेत.

वेबदुनिया वर वाचा