काँग्रेसचे 'युवराज' सरसावले!

शनिवार, 4 सप्टेंबर 2010 (10:40 IST)
निहालगढ येथे गत जुलैमध्ये एका महिलेल्या हत्येप्रकरणी तिच्या बहिणीची तक्रार ऐकून काँग्रेस 'युवराज' राहुल गांधी यांनी आज थेट अमेठीतील मुसाफिरखाना पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची पुनर्चौकशी करण्याची सूचना केली. गत एक जुलै 2010 रोजी निहालगढ येथील मुसाफिरखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत यास्मीन बानो ही महिला मृतावस्थेत आढळली होती. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मृत पावलेल्या यास्मीनची बहीण सरफराज बानोने आज गौरगंज येथे राहुल गांधींची भेट घेऊन मदतीची याचना केली. राहुल गांधींनी सरफराजचे गार्‍हाणे ऐकून थेट मुसाफिरखाना पोलिस ठाणे गाठल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस काही लोकांच्या प्रभावाखाली येऊन खर्‍या आरोपीला अटक करीत नसल्याची सरफराजची तक्रार होती.

राहुल गांधींनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी 20 मिनिटे चर्चा करून, योग्य कारवाई करण्याची सूचना केली. या प्रकरणाची पुनर्चौकशी करून महिनाभरात खर्‍या आरोपीला अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी त्यांना दिले.

वेबदुनिया वर वाचा