आयएसआय चे हेरगिरीचे करणारे रॅकेट उद्ध्वस्त

सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (09:44 IST)
नवी दिल्ली- मेरठ आणि कोलकाता येथे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे संशयित एजंट जाळ्यात सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आयएसआयच्या भारतातील हेरगिरीचं मोठं रॅकेटचं उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईत बीएसएफ जवानासह अन्य एका आयएसआय एजंटला अटक करण्यात आली आहे.
 
जम्मू- काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी कैफेतुल्ला खान ऊर्फ मास्टर राजा (वय ४४) आणि सीमा सुरक्षा दलाचा कर्मचारी अब्दुल रशीद यांना दिल्ली पोलिसांनी जम्मूतील रेल्वे स्थानकावरून अटक केल्याचे दिल्लीतील संयुक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी सांगितले. खान गुरुवारी रेल्वेने जम्मूमध्ये पोचला होता, त्यानंतर तो या रॅकेटसाठी आणखी काही लोकांना नियुक्त करण्यासाठी भोपाळला जाणार होता. खानवर मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांची नजर होती.
 
कोलकत्यामध्ये शहर पोलिसांच्या विशेष कृती दलाने हेरगिरीप्रकरणी कंत्राटी कामगारासह त्याचा मुलगा आणि अन्य एका नातेवाइकास अटक केली आहे. या सर्वांचा आयएसआयशी संबंध आहे. इर्शाद अन्सारी (वय ५१) हा गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. त्याचा मुलगा अशफाक अन्सारी (वय २३) आणि त्याचा नातेवाईक महंमद जहाँगीर यांना दुपारी डॉ. सुधीर बोस रोडवरून अटक करण्यात आली. हे सर्वजण गार्डन रिच परिसरामध्ये राहतात अशी माहिती सूत्रांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा